आरोपी महिलेस सात वर्षांची सक्तमजुरी
आठवडे बाजारातून अल्पवयीन मुलीस पळवून आणून तिला अनैतिक देहव्यापारास लावणाऱ्या संगीता रविंद्र वैरागर या महिलेस येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. कुलकर्णी यांनी सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. या खटल्यातील अन्य दोन महिलांची निदरेष मुक्तता करण्यात आली.
टाकळीभान येथील आठवडे बाजारातून दि. ३१ ऑक्टोबर २०११ रोजी एका अल्पवयीन मुलीस संगीता वैरागर, संगीता अमोलिक व शकुंतला गायकवाड या तीन महिलांनी घरी सोडतो, असे सांगून मोटारीत बसविले. पण तिला घरी न सोडता माळवाडगाव या आडमार्गाने सुतगिरणी भागात आणले. तिला अनैतिक देहव्यापार करण्यास भाग पाडले. ही घटना उघड झाल्यानंतर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला होता. खटल्याची सुनावणी न्यायाधिश कुलकर्णी यांच्यासमोर झाली. सरकारी वकील भानुदास तांबे यांनी पिडीत मुलगी, तिचे आई-वडील, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल मोमले, प्रतिक देशमुख, तपासणी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विलास पाटील यांच्या साक्षी घेतल्या. न्यायालयाने संगीता वैरागर हिला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
खटल्यातील दोषी आरोपी संगीता वैरागर हिची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने फिर्यादी मुलीस नुकसान भरपाई देण्याचा प्रस्ताव जिल्हा विधीसेवा प्राधिकरण यांच्याकडे पाठवावा, असेही निकालपत्रात म्हटले आहे.