स्त्रीच्या भावविश्वातील तिच्या जोडीदाराचे स्थान हा विषय गहन आणि तेवढाच गुंतागुंतीचा. तारुण्याच्या उंबरठय़ावरील मुलींच्या भावना आणि पालकांची जबाबदारी या प्रश्नावर अनेक लोक आपापल्या परीने उत्तर शोधण्याचा प्रयत्न करताहेत, पण अमरावतीच्या मीरा कडबे यांनी गेल्या वीस वर्षांपासून कौटुंबिक सल्लागार म्हणून आणि अलीकडेच ओलावा महिला बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून जे कार्य केले आहे त्यातून अनेक प्रश्नांची उकल झालीच, शिवाय असंख्य कुटुंबांना दिलासाही मिळवून दिला आहे.
महिला सक्षमीकरणासाठी अनेक संस्था कार्यरत आहे, पण मीरा कडबे यांच्या संस्थेच्या कार्याचे स्वरूप मात्र वेगळे आहे. प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहून अस्पर्शित अशा विषयांवर मीरा कडबे यांनी दोन दशकांपूर्वी कार्य सुरू केले तेव्हा त्यांची फारशी ओळख समाजाला नव्हती. पती-पत्नी संबंधातले अंतर्गत प्रश्न हे ज्याचे त्यांनी सोडवायचे, असे सांगून समाजातील मुखंडही मोकळे होतात, पण हेच प्रश्न जेव्हा पराकोटीला जातात तेव्हा समाजाला त्याची झळ बसते. प्रश्नांच्या सुरुवातीलाच काही उपाययोजना करता आल्यास अनिष्ट प्रसंग टाळता येऊ शकतात.
कौटुंबिक सल्लागार म्हणून काम करताना मीरा कडबे यांनी कौटुंबिक समस्यांच्या बाबतीत अनेक जोडप्यांना मार्गदर्शन केले. ज्यांना वेगळ्या वाटांनी जायचे होते त्यांना त्या उपलब्ध करून दिली, अनेक जोडप्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून त्यांनी वाचवले. मीरा कडबे या ओलावा महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष आहेत. या संस्थेच्यावतीने अमरावतीच्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या आवारात महिला आणि मुलांसाठी सहायता कक्ष चालवला जातो. अनेक वर्षांपासून त्या समुपदेशन करीत आहेत. महिलांना कायद्याची माहिती व्हावी, महाविद्यालयीन मुला-मुलींसाठी प्रबोधन हा समुपदेशन केंद्राचा हेतू आहे.
त्यांच्या संस्थेमार्फत यावर्षी ३२५ कुटुंबांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले. कुटुंब विस्कळीत झाले की, कुटुंबातील लहान मुलांवर त्याचा सर्वाधिक विपरीत परिणाम होत असतो. अशा कुटुंबांची विस्कटलेली घडी सुधारण्याचे काम या संस्थेने केले आहे. त्यांच्या संस्थेमार्फत महाविद्यालये आणि शाळांमध्ये ‘मी आणि माझी ओळख’ हा उपक्रम राबवला जात आहे. शाळकरी आणि महाविद्यालयीन मुला-मुलींना त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यावर योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. मुलगा किंवा मुलगी त्यांचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असते. प्रेम हा नाजूक विषय याच वयात स्पर्श करीत असतो. त्यात गुरफटणाऱ्या आणि खोटय़ा प्रेमाच्या जंजाळात आपल्या आयुष्याची धुळधाण करणाऱ्या मुलींची संख्या वाढतच आहे. अशा स्थितीत ‘केस स्टडी’च्या माध्यमातून मुला-मुलींसमोर विश्लेषण करून देणे, त्यांना चुकीच्या गोष्टींपासून परावृत्त करणे हा त्यांच्या प्रबोधनाचा उद्देश असतो. अनेक महाविद्यालयांमध्ये त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. खोटय़ा प्रेमात अडकलेल्या मुलींनी पत्रे लिहून आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत.
संस्थेच्या माध्यमातून मुलींना प्रशिक्षण द्यायचे आणि या प्रशिक्षित मुली इतर मुलींना सजग करतील, अशी त्यांची नवीन योजना आहे. त्यावर कामही सुरू झाले आहे. मुलींवरील अत्याचाराचा विषय आज सर्वत्र चर्चेला आला आहे. ओलावा संस्थेचे कार्य या पाश्र्वभूमीवर अधिक महत्त्वाचे ठरले आहे.
समुपदेशनाची गरज केवळ अल्पशिक्षितच नव्हे, तर उच्चशिक्षित कुटुंबांनाही असल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या संस्थेच्या कार्याची दखल आता विविध स्तरांवर घेतली जात आहे.