संपूर्ण सोलापूर जिल्ह्य़ाची आर्थिक नाडी समजल्या जाणाऱ्या आणि जिल्ह्य़ाच्या राजकारणाचे महत्त्वाचे सत्ताकेंद्र म्हणून ओखळल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे आमदार दिलीप ब्रह्मदेव माने यांची एकमताने निवड झाली. तर, उपाध्यक्षपदासाठी मंगळवेढय़ाचे बबन अवताडे यांना संधी मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असूनदेखील पक्षांतर्गत गटबाजीचा फायदा घेत आमदार दिलीप माने यांनी बाजी मारली. यानिमित्ताने राष्ट्रवादीअंतर्गत राजकीय काटशहाच्या राजकारणात मोहिते-पाटील गटाने एका दगडात अनेक पक्षी मारल्याचा निष्कर्ष राजकीय जाणकार काढत आहेत.
शनिवारी सकाळी जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयात बँकेच्या संचालक मंडळाची बैठक उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी अध्यक्षपदासाठी आमदार दिलीप माने, तर उपाध्यक्षपदासाठी बबन अवताडे यांचे एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे उभयतांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवड जाहीर होताच माने समर्थकांनी बँकेसमोर गुलाल उधळून फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करून मोठा जल्लोष केला.
अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया होण्यापूर्वी बँकेचे ज्येष्ठ संचालक तथा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह शेकापचे नेते,आमदार गणपतराव देशमुख, सुधाकर परिचारक, आमदार दिलीप सोपल व आमदार बबनराव शिंदे या श्रेष्ठींनी अध्यक्षपदाच्या इच्छुकांसह सर्व संचालकांचे मनोगत ऐकून घेतले. अध्यक्षपदासाठी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील-अनगरकर यांचे नाव अग्रेसर होते. याशिवाय आमदार दिलीप माने व विधानपरिषद सदस्य दीपक साळुंखे यांनीही स्वत:साठी मोर्चेबांधणी केली होती. तसेच विद्यमान अध्यक्ष संजय शिंदे यांनी मुदतवाढीची इच्छा व्यक्त केली होती. आमदार दिलीप माने यांचा अपवाद वगळता उर्वरित सर्व इच्छुक राष्ट्रवादीचे होते. परंतु त्यांच्यात एकमत होत नव्हते. त्यामुळे अखेर श्रेष्ठींनी आमदार दिलीप माने यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून अध्यक्षपदाचा गुंता सोडविला. आमदार माने यांचे नाव निश्चित होताच इतर इच्छुकांमध्ये निराशेचे सावट पसरले होते.
यानिमित्ताने झालेल्या घडामोडीत मोहिते-पाटील गटाची भूमिका महत्त्वाची ठरल्याचे मानले जात आहे. या बँकेवर मोहिते-पाटील गटाचे वर्षांनुवर्षे वर्चस्व होते. परंतु मागील विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्य़ातील राजकीय समीकरणे बदलत गेली. परिणामी जिल्हा बँकेवरील मोहिते-पाटील यांची पकड शिथिल झाली. त्याचाच लाभ घेत गेल्या वर्षी उपमुख्यमंत्री अजित पवार समर्थक आमदार बबनराव शिंदे यांचे बंधू संजय शिंदे हे या बँकेच्या अध्यक्षपदावर विराजमान झाले होते. त्यांचा कार्यकाळ संपत असताना नूतन अध्यक्ष निवडीबद्दल राजकीय हालचालींना जोर चढला. यात मोहिते-पाटील गटाने सुरूवातीपासून शांत राहण्याची भूमिका अंगीकारली होती. मात्र त्यामुळे ऐनवेळी हा गट कोणती भूमिका घेतो, याकडे सर्वाचे लक्ष वेधले होते. घडलेही तसेच. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीअगोदर काही तासात घडलेल्या राजकीय हालचाली महत्त्वाच्या ठरल्या. यात मोहिते-पाटील गटाने टाकलेले फासे यशस्वी ठरले.
या घडामोडीत एका दगडात अनेक पक्षी मारले गेल्याचे राजकीय निरीक्षक सांगतात. विशेषत: दक्षिण सोलापूर तालुक्यातील सुरेश हसापुरे यांना मोठा धक्का बसल्याचे सांगितले जाते. दक्षिण सोलापूरच्या राजकारणात हसापुरे हे आमदार दिलीप माने यांचे राजकीय हाडवैरी. मूळ मोहिते-पाटील गटाचे हसापुरे हे अडचणीच्या काळात साथ सोडून विरोधकांना जाऊन मिळाले. आता आपले कट्टर प्रतिस्पर्धी आमदार दिलीप माने यांना अध्यक्षपद मिळाल्याने हसापुरे यांची राजकीय वाटचाल बिकट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर विधान परिषद दीपक साळुंखे यांचाही भ्रमनिरास झाला. अध्यक्षपदासाठी प्रमुख दावेदार मानले गेलेले माजी आमदार राजन पाटील यांचेही नाव मागे पडले. त्यांना स्वकीयांनीच विरोध केल्याचे समजते. त्यामुळे प्राप्त परिस्थितीचा पुरेपूर लाभ आमदार दिलीप माने यांना मिळाला आणि त्यांचे भाग्य उजळले.
नूतन अध्यक्ष आमदार दिलीप माने हे दक्षिण सोलापूरचे काँग्रेसचे आमदार आहेत. दिवंगत माजी आमदार ब्रह्मदेव माने यांचे पुत्र असलेले दिलीप माने यांच्या ताब्यात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतिपदासह ब्रह्मदेव माने सहकारी बँक, सिध्दनाथ साखर कारखाना, ब्रह्मदेव माने अभियांत्रिकी महाविद्यालय आदी महत्त्वाची सत्तापदे आहेत. यात मागील २० वर्षांपासून  जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक राहिल्यानंतर आता अध्यक्षपदाचा मान मिळाल्याने आमदार माने यांची ही चढती कमान समजली जात आहे. नूतन उपाध्यक्ष बबन अवताडे हे मंगळवेढय़ाचे आहेत. ते या बँकेच्या संचालक मंडळावर तिसऱ्यांदा प्रतिनिधित्व करीत आहेत. मागील वर्षी त्यांना उपाध्यक्षपदाने हुलकावणी दिली होती.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २२० शाखा कार्यरत असून बँकेच्या ठेवी २९३५ कोटी एवढय़ा आहेत, तर २३२१ कोटींची कर्जे वितरित आहेत. ८४८ कोटींची गुंतवणूक झाली आहे. कर्जवसुलीचे प्रमाण ७५.२५ टक्के इतके आहे. बँकेला लेखापरीक्षणात गतवर्षी ‘अ’ वर्गाऐवजी ‘ब’ वर्ग मिळाला असून कारभारात सुधारणा करून पुन्हा ‘अ’ वर्गात कायम राहण्याचा बँकेचा लौकिक प्राप्त करून देण्याची ग्वाही नूतन अध्यक्ष आमदार दिलीप माने यांनी दिली.