मुळा धरणाच्या सध्या सुरू असलेल्या आवर्तनातून नेवासे तालुक्यातील ३११ तलाव भरून देण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आमदार शंकरराव गडाख यांनी शनिवारी सायंकाळी उपोषण मागे घेतले. दरम्यान मुळा विभागाचे कार्यकारी अभियंता एम. पी. खाडे यांच्या निलंबनासह अन्य मागण्यांबाबत परवा (सोमवार) मंत्रालयात जलसंपदामंत्री सुनिल तटकरे यांच्याकडे बैठक घेण्याचे ठरले.
जिल्ह्य़ाचे पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी या आंदोलनात मध्यस्थी केली. गेल्या तीन दिवसांपासून मुळा धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सुरू आहे. या आवर्तनात तालुक्यातील ८७ तलाव भरून देण्याचे नियोजन आहे. मात्र ३११ तलाव भरून द्यावे, या पाण्याच्या अन्यायकारक वाटपाबद्दल कार्यकारी अभियंता खाडे यांना निलंबित करावे, प्रवरा नदीवरील १३ बंधारे भरून द्यावे, भंडारदरा धरणातून नेवासे तालुक्यातील ३ टक्के क्षेत्राला हक्काचे पाणी मिळावे, तालुक्यात कालव्यांनजिक खंडित करण्यात आलेला वीजपुरवठा सुरू करावा आदी मागण्यासांठी आमदार गडाख यांनी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयबाहेर उपोषण सुरू केले होते.
तत्पुर्वी याच मागण्यांसाठी घोडेगाव येथे नगर-औरंगाबाद राज्यमार्गावर रस्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात तसेच नगर येथील उपोषणात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, अशोक गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य अभिजित लुणिया आदी सहभागी झाले होते.
दुपारी तीनच्या सुमारास पालकमंत्री पाचपुते येथे आले. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनाशाम शेलार आदींनी अतिरिक्त जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्यासमवेत बराच वेळ चर्चा केली. निवासी उपजिल्हाधिकारी सदानंद जाधव तसेच खाडे हेही या वेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार बाहेरगावी होते. त्यांच्याशी, तसेच जलसंपदामंत्री सुनिल तटकरे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केल्यानंतर सध्या सुरू असलेल्या आवर्तनातूनच तालुक्यातील ३११ तलाव भरून देण्याचे मान्य करण्यात आले, तसे लेखी आश्वासन जगताप यांनी दिले. त्यानंतर आमदार गडाख यांनी पाचपुते यांच्या हस्ते लिंबूपाणी घेऊन उपोषण मागे घेतले. अन्य मागण्यांसाठी परवा (सोमवार) मुंबईत बैठक घेण्याचेही तटकरे यांनी मान्य केले.
खाडे यांच्या गावात पाणीगळती
आमदार गडाख यांच्यासह कार्यकर्त्यांनी पूर्ण आंदोलनात खाडे यांच्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. त्यांचे मूळ गाव माका याच लाभक्षेत्रात येते. नेमक्या त्यांच्याच गावात परवा (गुरवारी) रात्री मुख्य कालवा फोडण्यात आला, त्यात मोठय़ा प्रमाणावर पाण्याची गळती झाली. या गावात दरवर्षी असे प्रकार होतात असे सांगून कार्यकर्त्यांनी त्याला खाडे यांनाच जबाबदार ठरवले.