राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, केंद्रिय मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्री बबनराव पाचपुते युवा मंचने आयोजित केलेल्या शरिरसौष्ठव स्पर्धेत मानाचा ‘मिस्टर इंडिया’ किताब व शरद पवार करंडक उत्तर प्रदेशच्या मोहमद वसीमने पटकावत रोख ५१ हजार रुपयांचे बक्षीस मिळवले. अजित थोपटे (बेस्ट पोझर, महाराष्ट्र) व योगेश शिंदे (बेस्ट इम्प्रुव बॉडी, महाराष्ट्र) यांनी इतर किताब मिळवले.
वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेत विविध राज्यांतून सुमारे १५०हून अधिक शरिसौष्ठवपटू सहभागी झाले होते. मंत्री पाचपुते व युवा नेते विक्रमसिंह पाचपुते यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. विविध गटांतील विजेत्यांना एकूण ३ लाख ९३ हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात आली. अखिल भारतीय शरिरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष माधव पुजारी, युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष उमेश पाटील, दादा कळमकर, अशोक बाबर, विश्वनाथ कोरडे, सिद्धार्थ मुरकुटे, शरद नवले, संजय चोपडा, राजेंद्र चोपडा आदी उपस्थित होते.
स्पर्धेचे संयोजन विक्रमसिंह पाचपुते, संघटनेचे उपाध्यक्ष योहान मकासरे आदींनी केले. पंच म्हणून सुरेश कदम (मुंबई), सुरेश चव्हाण (नगर), अविनाश असलमराव (नगर), गोगाई (प. बंगाल), जाकीर शेख (पुणे), सुरेश तळेकर यांनी केले. स्पर्धा ५५ किलो, ६०, ६५, ७०, ७५, ८० व ८५ किलो वजन गटात झाली. चाचणी फेरीत सुमारे २५० स्पर्धक सहभागी झाले होते. त्यातून १५० जण अंतिम फेरीसाठी निवडण्यात आले.
स्पर्धेतील गटनिहाय विजेते असे- ताता राव (आंध्र प्रदेश), जॉय सहा (प. बंगाल), पार्थज्योती हजारिका (प. बंगाल), मोहमद वसीम (उत्तर प्रदेश), फहिम कुरेशी (उत्तर प्रदेश), संदिप पाडळे (महाराष्ट्र), जोसेफ शिंदे (महाराष्ट्र). स्पर्धेस नगरकरांनी मोठी गर्दी केली होती.