वाढीव वीजदर कमी करावेत या मागणीसाठी गेली काही दिवस विविध आघाडय़ांवर सुरू असलेल्या आंदोलनाची शासन पातळीवरून अद्याप कोणतीही दखल घेतली जात नसल्यामुळे ही मागणी धसास लावण्यासाठी आता येथील यंत्रमागधारकांनी थेट मालेगाव ते मुंबई असा मोटारसायकल मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी सकाळी येथून हा मोर्चा मुंबईला रवाना होणार असून मंत्रीमंडळाच्या साप्ताहिक बैठकीच्या निमित्ताने मंत्रालयावर मोर्चा काढून आपल्या मागणीकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
अलीकडेच झालेली वीज दरवाढ यंत्रमाग व्यवसायाच्या मुळावर आल्याची ओरड करत ही दरवाढ मागे घ्यावी अशी यंत्रमाग व्यावसायिकांची मागणी आहे. त्यासाठी पॉवरलुम कंझ्युमर्स असोसिएशनतर्फे येथे या व्यावसायिकांनी सर्वपक्षीय आंदोलन सुरू केले आहे. त्या अनुषंगाने वीज देयकांची होळी, धरणे, शहरभर मोटारसायकल रॅली, राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको, सहा दिवसांचा यंत्रमाग बंद अशा स्वरूपाची आंदोलने यापूर्वी येथे करण्यात आली. या विषयी शासन स्तरावरून उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती स्थापन करण्यात आली आहे. परंतु, त्यात कालहरण केले जात असल्याचा आरोप होत आहे. तसेच ही दरवाढ मागे घेण्याबाबत अद्याप ठोस स्वरूपाची कारवाई झाली नसल्याने या व्यावसायिकांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. या आंदोलनानंतरही शासन स्तरावरून वीज दरवाढ मागे घेतली जात नसल्यामुळे सोमवारी रात्री येथील अन्सार जमातखान्यामध्ये माजी आमदार निहाल अहमद यांच्या अध्यक्षतेखाली व्यावसायिकांची आंदोलनाची पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी बैठक झाली. बैठकीस आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल, युनूस इसा, युसूफ इलियासी,बुलंद एकबाल आदी उपस्थित होते.बैठकीत मालेगाव ते मुंबई असा मोटारसायकल मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.