राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात ‘मराठा विद्या प्रसारक समाज संस्थे’चा दबदबा अतिशय मोठा असून शतक महोत्सव साजरा करणाऱ्या या संस्थेस शासन स्तरावरून सर्वेतोपरी मदत करण्यास आपण पुढे राहणार असून खासदार निधीतून वेळोवेळी मदत करण्याची ग्वाही खा. हेमंत गोडसे यांनी दिली.देवळाली कॅम्प येथील एसव्हीकेटी महाविद्यालयात स्थानिक व्यवस्थापन समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शतक महोत्सव साजऱ्या करणाऱ्या मविप्र संस्थेला अनेक समाजधुरीणांनी वेळोवेळी दिलेले नेतृत्व व मार्गदर्शन महत्वाचे असल्याचे खा. गोडसे यांनी सांगितले. संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी कार्याचा आढावा सादर करताना येणाऱ्या अडचणींचा उहापोह केला. सर्वाच्या सहकार्यातून समस्या सोडविल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास संस्थेचे संचालक मुरलीधर पाटील, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष खा. राजाभाऊ गोडसे, नामदेव गोडसे, अ‍ॅड. एन. जी. गायकवाड आदी उपस्थित होते.
प्रास्तविकातून प्राचार्य बाबाजी आहेर यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख मांडला. संस्थेसाठी खा. गोडसे यांना आपल्या निधीतून अद्ययावत विशेष वर्गासाठी मदत करण्याचे आवाहन करताना इमारतीच्या चटईक्षेत्राबाबतचा प्रश्न सोडविणे गरजेचे असल्याचे निदर्शनास आणले. २०१४-१५ या शैक्षणिक वर्षांतील प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पध्दतीने राबविली जाणार असल्याचे संस्थेने निश्चित केले असल्याची माहितीही त्यांनी दिली. आभार प्रा. सुहास फरांदे यांनी मानले.