शरीरसौष्ठव स्पर्धेत भारत व महाराष्ट्र श्री किताब पटकविणारा पनवेलचा नायब तहसीलदार सुहास खामकर याला ५० हजारांची लाच घेताना सोमवारी लाचलुचपत अधिकाऱ्यांनी अटक केली असली तरी खामकरचे हे उद्योग गेली अनेक दिवस सुरू होते, अशी माहिती पुढे आली आहे. रायगड जिल्हयात मोठय़ा प्रमाणात चालणाऱ्या रेती, खडी, उत्खननावर करडी नजर ठेवण्यासाठी मजबूत शरीरयष्टी असणाऱ्या खामकरला सरकारने नियुक्त केले होते, पण त्याने येथील रेती, खडी उत्खनन करणाऱ्या माफियांकडून मासिक लक्ष्मी दर्शन घडवून घेतले होते, असे तपासात पुढे येत आहे. ठाणे व रायगड जिल्ह्य़ात फार मोठय़ा प्रमाणात खडी व रेती उपसण्याचा व्यवसाय आहे. या उत्खननावर सरकारने जवळपास बंदी घातली आहे. त्यामुळे रेती उपसा करणाऱ्या व्यावसायिकांना शहरापासून दूर महाड, चिपळूण येथील रेती आणावी लागते. रायगड व ठाणे जिल्ह्य़ाला लाभलेला खाडीकिनाऱ्यावर चोरी चोरी चुपके चुपके रेती उत्खनन केले जाते. यावर देखरेख ठेवण्याचे काम जिल्हाधिकारी कार्यालयाचे असून खामकर यांना या कामावर नजर ठेवण्यासाठी नेमण्यात आले होते, पण या नजर ठेवण्याच्या कामामागे खामकर यांनी नजराणा मिळविण्याचे उपद्व्याप जास्त केल्याचे दिसून येते. बलदंड यष्टी, उंच धिप्पाड व्यक्तिमत्त्व असल्याने खामकर यांना पाहिल्यानंतरच धडकी भरत होती. त्यामुळे रेती उत्खननात आघाडीवर असलेल्या पनवेल, उरण तालुक्यातील रेती माफियांनी खामकर यांना महिन्याचा नैवेद्य ठरवून टाकला होता. हा नैवेद्य एका गाडीमागे पन्नास हजार ते एक लाख रुपयांपर्यंत होता. त्यामुळे मागील दोन वर्षांत खामकर यांनी किती माया जमा केली याची तपासणी होणे गरजेचे असल्याची मागणी केली जात आहे. नायब तहसीलदाराच्या जोरावर त्यांनी अनेकांना पोलीस ठाण्याची हवा खायला लावली होती. मासिक प्रसाद योजनेत समाविष्ट न होणाऱ्यांवरही कारवाई केली जात होती. गरिबीतून वर आलेल्या खामकर यांना चांगल्या दिवसात दुर्बुद्धी सुचल्याने क्रीडा क्षेत्रात नाराजी व्यक्त होत आहे.



