आई-वडिलांना प्रदक्षिणा घालून पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य मिळविणारा बाळ गणेश, जिजामातांनी सांगितलेल्या राम-कृष्णांच्या गोष्टींमधून प्रेरणा घेत स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज, यशोधेच्या घरी वाढलेला कृष्ण असे पौराणिक आणि ऐतिहासिक प्रसंग तर दुसरीकडे गाईचे वासरू, चिमणीची पिल्ले आणि आजच्या काळात मुलांवर संस्कार करणारी आई असे प्रसंग आपल्या माती कामातून साकार करत आई आणि मुलाचे नाते हळुवारपणे उलगडण्याचा प्रयत्न ठाण्यातील विशेष विद्यार्थ्यांनी शुक्रवारी केला. ठाण्यातील रोटरी क्लबच्या वतीने आयोजित स्पर्धेस विशेष मुलांनी भरभरून प्रतिसाद दिला.  
ठाण्यातील रोटरी क्लब ऑफ ठाणे संस्थेच्या वतीने गेल्या १९ वर्षांपासून विशेष मुलांसाठी ‘होरायझन’ या एकदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. चित्रकला, रंगकाम, मातीकाम, गुणदर्शन अशा स्पर्धाचे आयोजन केले जाते. ठाणे जिल्ह्य़ातील ठाणे, डोंबिवली, उल्हासनगर आणि बदलापूर तर मुंबईतल्या मुलुंड, दादर, भायखळा अशा सर्वच ठिकाणांहून मुले येत असतात. यंदा शुक्रवारी झालेल्या या स्पर्धेसाठी विविध शाळांतील सुमारे २३० विद्यार्थी ठाण्यातील घंटाळी येथील सहयोग मंदिर सभागृहात एकत्र आली होती. येथे त्यांनी आपल्या कलांचे विविध दर्शन घडवले. मातीकामासाठी मुलांना शाळेतील झेंडावंदन आणि मातृप्रेम हे दोन विषय सुचवण्यात आले होते. विद्यार्थानी आपल्या कल्पकतेनुसार या स्पर्धेत भाग घेत आपल्या गुणवत्तेचे उत्तम दर्शन घडवले. अत्यंत व्यावसायिक कलाकाराच्या तोडीची कला या विद्यार्थानी यावेळी सादर केली होती. या मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना प्रोत्साहन देण्याबरोबरच आम्हालाही या मुलांसोबत एक दिवस घालवता यावा या उद्देशाने आम्ही या उपक्रमाची सुरुवात केली होती. अनेक शिक्षक अत्यंत निरपेक्ष भावनेने या दिवशी कार्यरत असतात. विद्यार्थी आणि पालकही या उपक्रमात उत्साहाने सहभागी होतात, अशी माहिती प्रफुल्ल चिटणीस यांनी वृत्तान्तशी बोलताना दिली.