मुक्ता बर्वे हे नाव जेव्हा केव्हा ऐकू येतं तेव्हा तिच्याबद्दलचं कौतुक आणि ती करत असलेल्या गोष्टीचं अप्रूप या गोष्टी सहजतेने येतात. त्यामुळे मुक्ता पहिल्यांदाच एका नाटकाची निर्माती म्हणून समोर येणार आहे हे ऐकल्यावर साहजिकच ते नाटक कुठलं आहे, कोणत्या विषयावर आहे अशा सगळ्या गोष्टींबद्दलचं कुतूहल जागं होणं साहजिक आहे. इरावती कर्णिक या नव्या पिढीच्या लेखिकेचं हे नाटक आहे. आई आणि मुलीच्या नात्याकडे एका नव्या दृष्टिकोनातून पाहणारं हे नाटक आहे. त्यामुळे वेगळ्या लेखिकेच्या लेखणीतून उतरलेलं नवंकोरं आणि दमदार नाटक मी निर्माती म्हणून घेऊन येते आहे, ही नवीन गोष्ट आहे, असं मुक्ताने ‘वृत्तांत’शी बोलताना सांगितलं.
एकीकडे मालिका, चित्रपट आणि नाटक असं तिन्ही आघाडय़ांवर काम सुरू असताना मुक्ताला नाटय़निर्माती म्हणून नवी जबाबदारी का घ्यावीशी वाटली, या प्रश्नावर त्यामागे दोन कारणं असल्याचं मुक्ता सांगते. स्वत:ला आवडेल असं वेगळं काही तरी करावं, तेही कुठलीही तडजोड न करता, आपल्याला वाटतंय त्या पद्धतीने काही तरी करावं ही इच्छा खूप दिवस मनात घोळत होती. म्हणजे लोकांकडूनही तू काय वेगळं करणार आहेस, ही विचारणा व्हायची.
तेव्हाही मी कुठल्या तरी वेगळ्या क्षेत्रात येणार हे नक्की, असं मी त्यांना सांगत होते. आणि दिनू पेडणेकरांनी या नाटकात काम करण्याचं सांगितलं तेव्हा त्यांचं पाठबळ असल्यामुळे निर्माती म्हणून जबाबदारी घ्यायचं मी ठरवलं. त्यांच्याबरोबर मी इतकी र्वष काम केलं आहे, शिवाय, त्यांचा स्वत:चा या क्षेत्रातला अनुभव दांडगा असल्यामुळे मी अगदी शांतपणे ही जबाबदारी पेलू शकते आहे, असं मुक्ताने सांगितलं.
पण, थेट निर्माती म्हणून का उडी मारावीशी वाटली.. यावर निर्मिती म्हणजे मुळात सगळ्या गोष्टी या शब्दावर येऊन अडतात ही मला बारा वर्षांच्या अनुभवानंतर स्वत:लाही जाणवलेली गोष्ट आहे. कित्येकदा अरे!.. बजेट नव्हतं रे नाही तर अजून चांगलं करता आलं असतं, असे उद्गार निघतात. किंवा बऱ्याचदा काही बदल हे निर्मात्याला रुचणारे नसतात म्हणून केले जात नाहीत. त्यामुळे निर्मितीभोवती सगळ्या सर्जनशील गोष्टी अडतात हे लक्षात आलं आणि त्या अर्थाने मी नाटकाची निर्माती म्हणून पदार्पण करते आहे, असं मुक्ता सांगते. मात्र, त्याचबरोबर आपण नाटकाशिवाय राहू शकत नाही, हेही तिने स्पष्ट केलं.  मी बारा र्वष निष्ठेने आणि सातत्याने नाटक करते आहे कारण, नाटक मला आवडतं. माझं नाटकावर प्रचंड प्रेम आहे आणि मुळात मी नाटकाची विद्यार्थिनीच आहे. म्हणून, कितीही मालिका, चित्रपट असं सुरू असलं तरी माझे नाटकाचे प्रयोग सुरूच असतात. त्यामुळे नाटकाची निर्मिती मी सहजपणे करू शकेन, असा विश्वास वाटल्यानेच हे नवं आव्हान स्वीकारलं असल्याचं तिने मनापासून सांगितलं.  ऐन दिवाळीत मुक्ता या नाटकातील कलाकार आणि इतर तपशील जाहीर करणार आहे. गेली कित्येक र्वष एक कलाकार आणि त्याव्यतिरिक्त नाटकाकडे बघताना ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यात काय अडचणी असू शकतात, हे लक्षात आलं आहे, असं मुक्ता सांगते. आता ते लक्षात घेऊन टीव्ही मालिका, जाहिराती, सोशल मीडिया अशा अनेक माध्यमांतून आणि दृष्टिकोणातून आपण नाटक  लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असलो तरी हे सगळं नाटकाच्या संस्कृतीला धक्का न लावता करणार असल्याचंही तिने सांगितलं.
एकदा नाटकाच्या निर्मितीचं आव्हान पेलल्यानंतर पुढेमागे तू चित्रपट निर्मितीचा विचारही करशील ना.. असं विचारताच चित्रपट आणि नाटकात निर्मिती ही एक गोष्ट सोडली तर बाकी सगळ्याच गोष्टी फार वेगळ्या असल्याचं ती सांगते. आधी माझ्या नाटकाचं काय होतं ते बघू या, हे पाऊल तर नीट पडू दे मग पुढच्या गोष्टींचा विचार करता येईल. सध्या आपण नाटकावरच लक्ष केंद्रित केलं असल्याचं तिने सांगितलं.