गेल्या काही महिन्यांपासून विविध विकास प्रकल्पांमुळे कळवा-मुंब्र्य़ाचा मेकओव्हर करीत असल्याच्या राजकीय नेत्यांच्या वल्गना किती तकलादू आणि फसव्या आहेत, हे गुरुवारी मध्यरात्री कोसळलेल्या आणखी एका इमारतीने दाखवून दिले आहे. रेल्वे स्थानकाचा कायापालट आणि चौक सुशोभीकरण असल्या वरवरच्या मलमपट्टय़ांनी मुंब्रा तसेच कळव्यातील मूळ प्रश्न सुटणारे नाहीत. कारण एप्रिल महिन्यात कोसळलेल्या लकी कंपाउण्डमधील इमारतींसारख्याच अतिशय सुमार दर्जाचे बांधकाम साहित्य वापरून उभारलेल्या अनेक इमारती मुंब्रा-कळवा परिसरात असून शेकडो कुटुंबे धोका पत्करून या मृत्यूच्या सापळ्यात राहात आहेत. धोकादायक इमारतींमधील सर्व कुटुंबांना संक्रमण शिबिरात हलवून त्या जमीनदोस्त केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही.
पारसिकचा डोंगर आणि खाडीदरम्यान वसलेल्या ठाण्यातील या दोन उपनगरांध्ये धोकादायक अवस्थेत असलेल्या अनधिकृत बांधकामांची समस्या अत्यंत गंभीर आहे. मात्र या परिसरातील अनेक वस्त्या राजकीय पक्षांच्या एकगठ्ठा व्होट बँक असल्याने मूळ प्रश्न सोडविण्यापेक्षा अन्य तकलादू सुविधांचे गाजर दाखवून परिसराचा कायापालट केल्याचा देखावा करण्यात येतो. पारसिकच्या डोंगरावर अगदी वपर्यंत झोपडपट्टय़ा वसल्या आहेत. येथे पावसाळ्यात वारंवार दरडी कोसळत असतात. डोंगरालगत असणाऱ्या मुंब्रा परिसरातील काही इमारतींनाही दरडींपासून धोका आहे. दुर्दैवाने कधी येथे मोठय़ा प्रमाणात भूस्खलन झाले तर किती जिवीतहानी होईल, याची कल्पनाही करता येत नाही. लकी कंपाउण्डमधील इमारतींप्रमाणेच नित्कृष्ट दर्जाची बांधकामे कळव्यातील खारेगांव परिसरातही आहेत. बहुमजली इमारती बांधून त्यातील सदनिका भाडय़ाने देण्याचा येथील भूमाफियांचा प्रमुख व्यवसाय आहे. ठाण्याच्या तुलनेत येथील घरांचे दर अतिशय कमी आहेत. त्यामुळे अनेक मध्यमवर्गीयांनी या घरांचा आसरा घेतला आहे.
आता राजकीय प्रेरणेने कळवा-मुंब्रा परिसरात विस्तीर्ण रस्ते, चौक सशोभिकरण, नाटय़गृह आदी प्रकल्प साकार होत असले तरी त्यामुळे फार तर या परिसरातील नव्या इमारत संकुलांचे दर वाढून बांधकाम व्यावसायिकाचे उखळ पांढरे होईल, पण मूळ दुखणे काही बरे होणार नाही.
सुमार दर्जाचे बांधकाम साहित्य वापरून उभारलेल्या अनेक इमारती मुंब्रा-कळवा परिसरात असून शेकडो कुटुंबे धोका पत्करून या मृत्यूच्या सापळ्यात राहात आहेत. धोकादायक इमारतींमधील सर्व कुटुंबांना संक्रमण शिबिरात हलवून त्या जमीनदोस्त केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Jun 2013 रोजी प्रकाशित
मेकओव्हरच्या वल्गना, वरवरच्या मलमपट्टय़ा..!
गेल्या काही महिन्यांपासून विविध विकास प्रकल्पांमुळे कळवा-मुंब्र्य़ाचा मेकओव्हर करीत असल्याच्या राजकीय नेत्यांच्या वल्गना किती तकलादू आणि फसव्या आहेत, हे गुरुवारी मध्यरात्री कोसळलेल्या आणखी एका इमारतीने दाखवून दिले आहे.

First published on: 22-06-2013 at 12:06 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbra kalwa makeover possible after demolish dangerous buildings