शेतीसाठी पोखरलेला डोंगर व झाडांची केलेली उचलबांगडी यामुळे दरड कोसळून पुण्यात आलेली आपत्ती मुंबईकरांच्याही वाटेला कोणत्याही क्षणी येऊ शकते. चेंबूर येथे गुरुवारी, ३१ जुलै रोजी सकाळी दरड कोसळून पाच वर्षांच्या मुलाचा ओढवलेला मृत्यू हे केवळ हिमनगाचे टोक आहे. याचप्रमाणे गेल्या वीस वर्षांत मुंबईत विविध ठिकाणी कोसळलेल्या दरडींमुळे २०९ जणांचा बळी घेतला आहे तर १५०हून अधिक जण जखमी झाले आहे. मात्र या संकटातून लोकांना वाचविण्यासाठी कोणतीही प्रभावी योजना आखण्यात महानगरपालिका आणि राज्य सरकारला अपयश आले आहे. त्यामुळे आज घडीलाही २० हजार झोपडय़ांमधील सव्वा लाख नागरिक मुसळधार पावसात जीव मुठीत धरून राहत आहेत.
शहरातील जमीन संपल्याने टेकडी कुरतडून तेथे झोपडी उभारण्याचा प्रकार वर्षांनुवर्षांचा. स्थानिक दादा आणि राजकीय पक्ष यांच्या संगनमतानेच नवीन झोपडी उभी राहते हेदेखील गुपित राहिलेले नाही. अशा हजारो झोपडय़ांमुळे साकीनाका, अँटॉप हिल, भांडुप, विक्रोळी या भागातील टेकडय़ा झाकोळून गेल्या आहेत. मुंबईच्या मुसळधार पावसात या टेकडय़ांवरील माती, दगड किंवा कधीतरी एखादा भागच खाली येण्याचे प्रकारही घडतात आणि मग त्यात अनेकांचा बळी जातो.
एप्रिल २०१० मधील पाहणीनुसार दक्षिण मुंबईतील ४९ ठिकाणी तर उपनगरांतील २७८ ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका होता. या ठिकाणांवरील २२,४८३ झोपडय़ांना धोका असल्याचे सांगण्यात आले. यातील सुमारे ११ हजार झोपडय़ांना आधारिभतींचे संरक्षण पुरवण्यात आले. इतर झोपडय़ा मात्र तातडीने हटवण्याचे गरजेचे होते. १९९५ पासून आधारभिंती बांधण्यावर सुमारे २०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. मात्र या भिंतींमुळे दरडी कोसळणे थांबलेले नाही. २०१४ मध्ये पावसाळ्यापूर्वी दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या जागांची संख्या २६६ वर आली आहे. आधारभिंती बांधल्या तरी दरड कोसळण्याची शक्यता असल्याने आधारभिंती बांधलेली ठिकाणेही यात समाविष्ट आहेत.
टेकडय़ांवरील झोपडय़ा दूर करणे हा यावरील नामी उपाय. मात्र हक्काच्या मतपेटय़ांकडे लक्ष ठेवत कोणताही राजकीय पक्ष या झोपडय़ा दूर करण्याची भूमिका घेत नाही. राज्य सरकार व महानगरपालिका एकमेकांवर जबाबदारी ढकलून मोकळे होतात. झोपडपट्टी सुधार मंडळाने मुंबईतील झोपडय़ांची एप्रिल २०१० मध्ये पाहणी केली होती. शहरात किती मोकळी जागा उपलब्ध आहे ते पाहून शहर झोपडीमुक्त करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सप्टेंबर २०११ मध्ये दिले. मात्र अजूनही आराखडय़ाचा कागद कोराच आहे. टेकडय़ांवर जीव मुठीत घेऊन राहायला कोणाला आवडेल, मात्र मुंबईतील जागेची कमतरता आणि चढे भाव यामुळे वर्षांनुवष्रे ‘हक्काचे’ घर सोडण्यासाठी कोणीही तयार होत नाही. या दुष्टचक्रातून मार्ग काढल्याचे दाखवण्यासाठी मग थातूरमातूर उपाय योजले जातात. दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या भागातील झोपडय़ांना दरवर्षी पावसाळ्याआधी नोटिसा बजावून घर खाली करण्यास सांगणे हा त्यातीलच एक. अशा कागदी नोटिसांमुळे काहीही होणार नाही हे पालिकेच्या अधिकाऱ्यांनाही माहिती आहे आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनाही.
टेकड्यांवरील खाली येणारी माती व दगड अडवण्यासाठी बांधल्या जात असलेल्या आधारिभती हा दुसरा उपाय. पूर्व उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी अशा िभती म्हाडाकडून आमदारांना मिळणारया निधीतून उभारण्यात आल्या आहेत. मात्र लहान दगड अडवण्याखेरीज या िभतींचा उपयोग नाही, हे तेथील झोपडीधारकांनाही माहीत आहे. दरड कोसळल्यास ही िभतही त्यासोबत खाली येण्याचा धोका आहेच.गेल्या वर्षभरात धोकादायक इमारती कोसळण्याच्या चार घटनांमुळे पालिकेने या इमारतींबाबतचे धोरण तीव्र केले असल्याचे दाखवले. महापौर, आयुक्तांनी पाहणी केली, अनेक घोषणा केल्या, प्रत्यक्षात या पावसातही अनेक धोकादायक इमारतींमध्ये रहिवासी आहेत. दरडी कोसळण्याच्या घटनांचेही तसेच आहे. दरड कोसळून घाटकोपर आझाद नगरमध्ये २००० मध्ये ७८ जणांचा आणि साकीनाका येथे २००५ मध्ये ७३ जणांचा बळी गेला. दरडींमध्ये शेकडोंचा बळी गेल्यावर थातुरमातूर उपाय करून वेळ मारून नेली जाते. गेल्या दहा वर्षांत दरडींमुळे मोठी दुर्घटना झालेली नाही हे सुदैवच. मात्र दैव प्रत्येकवेळी मदत करेलच असे नाही..

दरडींमध्ये गेलेले बळी
१९९३-१७
१९९६ – ११
१९९७ – ११
२००० – ७८
२००५ – ७३
२००९ – ११
२०१० – १
२०११- १
२०१३- ५
२०१४-१
एकूण – २०९

Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
Municipal Corporation ignoring quakes in navi mumbai delayed in making rule for builders
नवी मुंबई : हादऱ्यांच्या मालिकेकडे महापालिकेचा काणाडोळा, बिल्डरांच्या सोयीसाठी नव्या नियमावलीला मुहूर्त सापडेना
Indiscriminate firing in nagpur by criminal over money of MD
नागपुरात एमडीच्या पैशावरून गुन्हेगाराचा अंधाधुंद गोळीबार, कुख्यात टोळ्या पुन्हा…
navi mumbai buses marathi news, navi mumbai bus poor condition marathi news
डिझेल बसगाड्यांची दुरवस्था, एनएमएमटीच्या डिझेलवरील बसगाड्यांची तात्पुरती डागडुजी करण्यावर भर