* राजकीय नेत्यांचा कारवाईत खोडा
* काही इमारतींचे वीज-पाणी तोडले
* पोलिसांकडून सहकार्य नाही
* १५ जूनला कारवाई करण्याचा निर्धार
मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतरही पालिका आयुक्तांना पालिकेच्या ७८ अतिधोकादायक इमारती आजपर्यंत रिकाम्या करता आलेल्या नाहीत. या इमारतींना राजकीय नेत्यांचेच अभय मिळत असून त्या रिकाम्या करण्यात ही नेतेमंडळीच खोडा घालत आहेत. त्याच वेळी पोलिसांचेही सहकार्य मिळत नसल्याने पालिका हतबल झाली आहे.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी पालिकेच्या अतिधोकादायक इमारती रिकाम्या कराव्यात, असे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले होते. त्यानुसार सेवा निवासस्थाने, शाळा, मंडई आणि पालिकेच्या अन्य मालमत्तांचा समावेश असलेल्या ७८ अतिधोकादायक इमारतींची यादी पालिकेने जाहीर केली. आयुक्त सीताराम कुंटे यांनी ही घरे तातडीने रिकामी
करण्याचे आदेश दिले. त्यानुसार घरे दोन दिवसात रिकामी करण्याची नोटीस या कर्मचाऱ्यांवर बजावण्यात आली. मात्र कर्मचाऱ्यांनी घरे रिकामी करण्यास स्पष्ट नकार दिला. या इमारतींचा पाणी आणि वीजपुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या पालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना या कर्मचाऱ्यांनी हुसकावून लावले. त्यामुळे पुन्हा एकदा पालिकेने या इमारतींमधील रहिवाशांवर नोटीस बजावली. त्यानंतर काही इमारतींचा पाणी आणि वीजपुरवठा खंडितही करण्यात आला. मात्र तरीही कर्मचारी घर सोडण्यास तयार नाहीत. आता तिसरी नोटीस बजावण्यात आली असून कोणत्याही परिस्थितीत १५ जून रोजी धोकादायक इमारती रिकाम्या करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
सेवा निवासस्थान आणि आसपासच्या परिसराची या कर्मचाऱ्यांना सवय झाली आहे. त्यामुळे ते दुसऱ्या विभागात राहण्यास तयार नाहीत. आपण राहात असलेल्या विभागात पर्यायी घर द्यावे अशी त्यांची मागणी आहे. परंतु पालिकेकडे त्याच विभागात जागा उपलब्ध नाहीत. त्यामुळे उपलब्ध असतील तेथेच त्यांना पर्यायी घरे देण्यात आली आहेत.
परंतु धोकादायक इमारतींमधील घर सोडण्यास ते तयार नाहीत. मात्र एखादी दुर्घटना घडली की पालिकेने नावाने ओरड केली जाते, असे पालिकेचे उपायुक्त मिलिन सावंत यांनी सांगितले.
पालिकेच्या शहरात ४३, पश्चिम उपनगरात १९, तर पूर्व उपनगरात १६ इमारती अतिधोकादायक स्थितीत आहेत. कुंटे आणि पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांची चर्चा झाली असून १५ जून रोजी पोलिसांच्या मदतीने या इमारती रिकाम्या करण्याची मोहीम हाती घेण्यात येईल. कदाचित सर्व इमारती रिकाम्या करता येणार नाहीत. परंतु दोन-तीन दिवसांत टप्प्याटप्प्याने त्या रिकाम्या केल्या जातील, असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला.
पालिकेच्या विभागनिहाय
अती धोकादायक इमारतींची संख्या
वॉर्ड इमारतींची संख्या
ए १
सी १
डी २
ई २६
एफ-दक्षिण ९
एफ-उत्तर ३
जी-दक्षिण १
एच-पश्चिम २
के-पूर्व ३
के-पश्चिम १०
पी-दक्षिण १
पी-उत्तर २
आर-दक्षिण १
एम-पूर्व १०
एम-पश्चिम १
एन ३
एस २
एकूण ७८