शौचास बसलेल्या निवृत्ती भागूजी गोराणे (वय ७५) या वृद्धाचा अज्ञात मारेक-यांनी तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केला. गोंधवणी येथील गोराणे वस्तीवर आज पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मृत गोराणे यांच्याशी मालमत्तेवरून वाद असणारा त्यांचा मुलगा, नातू यांच्यासह तिघा संशयितांची नावे फिर्यादीत नातेवाइकांनी दिली आहेत. शहर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, गोराणे वस्ती येथे राहणारे निवृत्ती गोराणे हे नेहमीच्या सवयीप्रमाणे पहाटे ४ ते ४.३० च्या सुमारास घरापासून काही अंतरावर शौचास गेले. जाताना त्यांनी नेहमीप्रमाणे घराला बाहेरून कुलूप लावले. त्यांच्यावर पाळत ठेवून अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यात, कपाळावर व गालावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. या हल्ल्यात गोराणे यांचा मृत्यू झाला. सकाळी ६ वाजेपर्यंत गोराणे घटनास्थळीच रक्ताच्या थारोळय़ात पडून होते.
सकाळी सहाच्या सुमारास पादचा-यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर पोलीस उपाधीक्षक अंबादास गांगुर्डे, निरीक्षक प्रकाश सपकाळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. त्यानंतर दुपारी शोकाकुल वातावरणात गोराणे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मृत गोराणे यांच्या पश्चात दोन पत्नी, मुले, नातवंडे असा परिवार आहे. गोराणे यांची येथेच शेती आहे. या शेतीवरून त्यांचा मुलगा कचेश्वर व नातू कृष्णा तसेच बाबासाहेब हरिभाऊ लबडे यांच्याशी त्यांचे वाद झाले होते. त्यामुळे मृत गोराणे यांचा भाचा दत्तात्रय लक्ष्मण वैद्य (वय ३०, रा. गोंधवणी, वॉर्ड नं. १, श्रीरामपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीत वरील तिघांची संशयित आरोपी म्हणून नावे दिलेली आहेत. याप्रकरणी शहर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून तपास निरीक्षक सपकाळे करीत आहेत.