अनोळखी आरोपींनी एका रिक्षा चालकाचा लाकडी दांडक्याने खून केला. सीताबर्डीवरील शासकीय तंत्रनिकेतन मागील मोकळ्या जागेत गुरुवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. नागपुरातील ही खुनाची ८१वी घटना आहे.
ज्ञानेश्वर रामप्रसाद कुमरे (रा. कुशीनगर) हे खून झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. लक्ष्मी टॉकीजसमोरील शासकीय तंत्रनिकेतनच्या मागच्या बाजूस रेल्वे रुळाकडे मोकळी जागा आहे. आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास कुणालातरी त्या परिसरात एका झाडाखाली एक तरुण मरण पावलेला दिसला. त्याने धावत जाऊन मुख्य रस्त्यावर ही बाब सांगितली. तेथे बघ्यांची गर्दी झाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती शेंडे यांच्यासह धंतोली पोलीस तेथे पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळाचे निरीक्षण केले. घटनास्थळी पत्ते विखरून पडले होते. विझलेली चूल होती. झाडाला ठोकलेल्या खिळ्याला एक पिशवी अडकवून होती. त्यात काही कपडे होते. मृत तरुणाच्या हातावर नाव गोंदलेले होते. डोके व पायावर जखमा होत्या व त्यातून रक्तस्राव सुरू होता. डोक्याखाली रक्ताचे थारोळे साचले होते. जवळच रक्ताने माखलेला लाकडी दांडका पडला होता. परिसरात बिअरच्या बाटल्याही होत्या.
हा मृतदेह ज्ञानेश्वर कुमरे याचा असल्याचे काही लोकांनी पोलिसांना सांगितले. तो या परिसरात सायकल रिक्षा चालवायचा व काही दिवसांपासून येथेच राहायचा. पोलिसांनी श्वानाला पाचारण केले. रेल्वे रुळापर्यंत श्वानाने माग दाखविला. तेथे जाऊन तो घुटमळला. मारेकरी तेथून कॉटन मार्केटच्या भागाने पळून गेले असावेत, अशी शंका आहे. पोलीस उपायुक्त चंद्रकिशोर मिना, सहायक पोलीस आयुक्त गंगाराम साखरकर यांनी घटनास्थळी भेट दिली.