तळजाई पठारावरील महाडिक मैदानावर बुधवारी सकाळी तरुणाच्या खुनाची घटना उघडकीस आली. हात उसने पैसे परत न केल्यामुळे झालेल्या वादातून हा खून झाला असून या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. शहरात सलग दुसऱ्या दिवशी खुनाची घटना घडल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दीपक राजू घाटे (वय २०, रा. साईसिद्धी चौक, आंबेगाव पठार) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्याची बहीण वर्षां महिंद्र कोडीतकर (वय २२, रा. आंबेगाव पठार) हिने दिलेल्या तक्रारीवरून वीरेश गुती, गौरव सारवाड, चेतन जमादार (रा. धनकवडी) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घाटे हा सुरुवातीस दांडेकर पूल येथे राहण्यात होता. त्यानंतर तो धनकवडी येथे राहण्यासाठी गेला. त्याच्या शेजारीच आरोपी वीरेश गुती हा राहत होता. त्याने त्यांच्याकडून काही पैसे उसने घेतले होते. दरम्यानच्या काळात तो आंबेगाव पठार येथे राहणाऱ्या बहिणीकडे राहण्यासाठी गेला होता. आरोपी गुती याने त्याच्याकडे पैशाची मागणी केली, मात्र, त्याने पैसे न दिल्यामुळे त्यांच्यात मंगळवारी दुपारी भांडणे झाली होती. संध्याकाळी घाटे याला रात्री परत आरोपींनी तळजाई पठार येथे बोलविले. या ठिकाणी घाटेवर कोयत्याने त्याच्या डोक्यात, हातावर, छातीवर वार करून खून केला. त्याचा मृतदेह त्या ठिकाणीच टाकून दिला. सकाळी टेकडीवर फिरण्यासाठी गेलेल्या नागरिकांना मृतदेह आढळून आला. या प्रकरणी सहकानगर पोलिसांनी तिघांना रात्री ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र तोडकर हे करत आहेत.