* दरोडा की पूर्ववैमनस् * घटनेने पोलीसही हादरले
* १५ लाख रुपये पळवले?
* वध्र्याजवळ वायगाव येथे पहाटे सशस्त्र हल्ला
वध्र्याजवळ वायगाव (निपाणी) येथील भुतडा कुटुंबीयांवर आज पहाटे झालेल्या हल्ल्यात कुटूंबप्रमुख वल्लभदास भुतडा यांचा निर्घृण खून, तर त्यांच्या पत्नी व दोन मुलींनाही जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रकार दरोडय़ाचा की पूर्ववैमनस्यातील खूनाचा, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. १२ तास लोटूनही तपासाचा तसूभरही धागा पोलिसांना गवसलेला नाही. घरातून १५ लाख रुपयावर ऐवज लुटून नेल्याबाबत मात्र तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. या घटनेने गावकऱ्यांसह पोलिसांमध्येही खळबळ उडाली आहे.
वध्र्यापासून १२ किलोमीटर अंतरावरील वायगाव (निपाणी) या शांतताप्रिय गावात घडलेल्या या अतिशय क्रूर घटनेमागे काय कारण असावे, याचा शोध घेण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक राजेंद्रसिंह हे सुध्दा घटनास्थळी पोहोचले. सोयाबीनचे व्यापारी वल्लभदास भुतडा खरेदीचा व्यवहार आटोपून बुधवारी रात्री नागपूरहून वायगावला पोहोचले. त्यावेळी पत्नी शीतल, मुली उन्नती (१३) व निकिता (९) घरीच होते. पहाटे ही घटना घडली. लहान मुलगी निकिता हिने आरडाओरड केला तेव्हा आरोपी पळून गेले. गावकरी लगेच धावले. पोलिसांना पाचारण करण्यात आले. या घटनेची प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या निकिताच्या सांगण्यानुसार घरात एका इसमाने प्रवेश करताच वडिलांना चाकूने भोकसले. आईला व आम्हा बहिणींनाही मारले. आम्ही बेशुध्द पडलो. यापुढचे आठवत नाही, असे निकिताने सांगितले. पोलिसांनी पंचनामा केला असून घरातून नेमका किती ऐवज पळवला, याविषयी निश्चित माहिती पुढे आलेली नाही. श्वानपथकाने पाच किलोमीटरपर्यंत धाव घेतली, पण काहीच मागमूस लागलेला नाही. घराचे मागील दार तुटून पडले आहे, पण घरातील वस्तू जागेवरच आहेत.
कपाट कुलूपबंद अवस्थेतच आहे. त्यामुळे तपासात सर्व संभ्रम आहे. मृत भुतडा यांच्याजवळ नेहमीच मोठी रोख रक्कम असायची. त्यांच्यावर पाळत ठेवून कुणी तरी हा हल्ला केला असावा, अशीही एक शक्यता वर्तविली जाते, पण घरात पत्नी व दोन मुलींना बेदम मारहाण करण्याची बाब या तपासातील गोंधळ वाढविणारी ठरत आहे. घरात रक्ताने माखलेला फ क्त एक सूरा सापडला. घटनास्थळी भेट देणारे विशेष पोलीस महानिरीक्षक राजेंद्रसिंह म्हणाले की, अद्याप कुठलाही ठोस निष्कर्ष काढता येणार नाही. आरोपींची संख्याही निश्चित झालेली नाही. सर्व बाजूने तपास सुरू आहे. भुतडा कुटुंबीय व त्यांच्या नातेवाईकांचीही चौकशी करू. मृताच्या पत्नीस नागपूरला सिम्समध्ये दाखल करण्यात आले असून त्यांचे बयाण महत्वाचे ठरेल, असे राजेंद्रसिंह यांनी भ्रमणध्वनीवरून लोकसत्ताशी बोलतांना सांगितले. याप्रकरणी तपासाची सूत्रे देवळी पोलिसांकडे सोपवण्यात आली आहेत. गावकरी व मृताच्या शेजाऱ्यांचेही बयाण नोंदविणे सुरू असल्याचे प्रभारी ठाणेदार गायकवाड यांनी सांगितले. रुग्णालयात पत्नी व मोठय़ा मुलीची स्थिती गंभीर असल्याची माहिती मिळाली. या घटनेने वायगावात सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गावातील ही अशी पहिलीच घटना असून अद्याप गावात दरोडाही कधी पडला नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 14th Dec 2012 रोजी प्रकाशित
सोयाबीन व्यापाऱ्याचा खून, पत्नी, मुलीही गंभीर जखमी
वध्र्याजवळ वायगाव (निपाणी) येथील भुतडा कुटुंबीयांवर आज पहाटे झालेल्या हल्ल्यात कुटूंबप्रमुख वल्लभदास भुतडा यांचा निर्घृण खून, तर त्यांच्या पत्नी व दोन मुलींनाही जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रकार दरोडय़ाचा की पूर्ववैमनस्यातील खूनाचा, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. १२ तास लोटूनही तपासाचा तसूभरही धागा पोलिसांना गवसलेला नाही. घरातून १५ लाख रुपयावर ऐवज लुटून नेल्याबाबत मात्र तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. या घटनेने गावकऱ्यांसह पोलिसांमध्येही खळबळ उडाली आहे.

First published on: 14-12-2012 at 01:53 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murdered of soyabin buisnessmen