या ना त्या कटकटीमुळे घर सोडले आणि मुंबई गाठली. पण ना कुठे आसरा मिळाला ना काम.. मुंबईत राहण्या-खाण्याची भ्रांत आणि घरी परतायची सोय नाही. अशा अवस्थेत कोटींच्या या गर्दीत एकाकी पडल्यानंतर समोर अंधारच होता.. पण ‘माय होम इंडिया’चे कार्यकर्ते आशेचा किरण बनून आले आणि कुणी सुखरूप घरी परतले, कुणाची मुंबईतच राहण्याची-शिक्षणाची सोय झाली. भरकटलेल्या आयुष्याला पुन्हा एक नवी दिशा मिळाली.
लखी गोगोई ही आसाममध्ये ढुबरी जिल्ह्य़ात राहणारी अवघ्या १२ वर्षांची मुलगी. वडिलांनी दुसरे लग्न केले आणि सावत्र आईचा जाच सुरू झाला. वडिलांना ते आवरणेही शक्य नव्हते आणि पाहणेही. मुलीची छळातून सुटका व्हावी म्हणून त्यांनी आपल्या एका परिचितांकडे विरारला लखीला पाठवले. पण आगीतून फुफाटय़ात अशी अवस्था झाली. ही मंडळी दिवसभर लखीला मोलकरणीपेक्षाही जास्त कामाला लावायची. लखी रडकुंडीला आली आणि एक दिवस संधी साधत घरातून निसटली. कुठे जायचे माहिती नव्हते. लोकलमध्ये बसली वांद्रय़ाला उतरली. तिथे ती एकाकी भरकटलेली पाहून एका महिला कॉन्स्टेबलचे लक्ष तिच्याकडे गेले. तिने चौकशी करून तिला डोंगरी सुधारगृहात पाठवले. लखी आसामची असल्याने सुधारगृहातील कर्मचाऱ्यांनी ईशान्य भारतात काम करणारी संघटना म्हणून ‘माय होम इंडिया’च्या सदाशीव चव्हाण यांना बोलावले. हकिकत जाणून घेतल्यावर आसाममधील कार्यकर्ते शिवशंकर यांच्या मदतीने तिच्या वडिलांचा शोध घेतला आणि त्यांना मुंबईत आणले. बाप-लेकीची भेट झाली. पण तिने घरी येण्यास ठाम नकार दिला. आता मोठा प्रश्न निर्माण झाला. पण शिशिर अस्थाना या हितचिंतकाने लखीचे पालकत्व स्वीकारण्याची तयारी दर्शवली. आता लखी मुंबईतच अस्थाना यांच्या घरी त्यांच्या पत्नी-मुला-मुलीसह राहत आहे. पुढच्या वर्षी तिच्या शिक्षणाचीही सोय होत आहे.
दिल्लीच्या सचिन पासवानची कथा थोडय़ाफार फरकाने सारखीच. कुटुंबासह तो फुटपाथवर राहायचा. पण शिक्षणाची फार गोडी. दहावीत ७० टक्के मिळवले. पण आता १७ वर्षांचा घोडा झालास, शिक्षणबिक्षण बास. आता कमवायला लाग, असा धोशा वडिलांनी लावला. त्यामुळे वैतागून थेट मुंबई गाठली. आठ-पंधरा दिवस भटकत राहिला. पण काही सोय लागेना. निराश होऊन एके रात्री विलेपार्ले स्थानकावर रडत बसला होता. दीडच्या सुमारास लोकलमधून राकेश जैन हे ‘माय होम’शी संबंधित कार्यकर्ते उतरले आणि त्यांचे लक्ष रडणाऱ्या सचिनकडे गेले. खूप भुकेला असल्याने थोडे खाऊ पिऊ घातल्यानंतर त्याची कहाणी समजली.
जैन यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना कळवले. रात्री दोन वाजता शरद गोगावले हे चुनाभट्टीहून रिक्षा करून पाल्र्याला पोहोचले. त्याला घेऊन घरी गेले. नंतर दिल्लीत सुनील देवधरांनी फुटपाथ पालथे घालत सचिनचे कुटुंब शोधले खरे. पण मुलाला शिकवणे शक्य नाही हा धोशा कायमच होता. अखेर सचिनच्या शिक्षणाचा खर्च ‘माय होम’ करेल पण त्याला शिकू द्या, असे सांगितल्यावर ते राजी झाले. आता सचिन घरी परतला आहे. रुळावरून घसरत असलेली त्याच्या आयुष्याची गाडी पुन्हा मार्गी लागली आहे. आतापर्यंत ईशान्य भारत हेच कार्यक्षेत्र असणारी ‘माय होम’ ही घरातूनच बेघर झालेल्यांचा आधार ठरली.
संग्रहित लेख, दिनांक 29th Oct 2013 रोजी प्रकाशित
घरातून बेघर झाले.. ‘माय होम इंडिया’ने आसरा दिला
या ना त्या कटकटीमुळे घर सोडले आणि मुंबई गाठली. पण ना कुठे आसरा मिळाला ना काम..

First published on: 29-10-2013 at 06:30 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: My home india support to homeless people