मुंबईवरील हल्ल्यातील अतिरेकी अजमल कसाब याला फाशी दिल्याचे नगरकरांनी स्वागत केले. फाशीची बातमी समजल्यानंतर शहराच्या काही भागात सकाळी फटाके वाजवून आनंद व्यक्त करण्यात आला. अनेक ठिकाणी सरकारच्या अभिनंदनाचे फलक लावण्यात आले.
वाहिन्यांवरील बातम्यांमुळे सकाळी साडेआठच्या सुमारास कसाबला येरवडा तुरूंगात फाशी देण्यात आल्याचे लोकांना समजले. केंद्र व राज्य सरकारने अत्यंत गोपनीयता पाळून केलेल्या फाशीच्या कार्यवाहीची माहिती मिळताच लोकांमध्ये फोनाफोनी सुरू झाली, थोडय़ाच वेळात ही गोष्ट कर्णोपकर्णी झाली.
सकाळी फाशीच्या अंमलबजावणीचे स्वागत करतानाच नगरकरांनी देशगौरवाच्या घोषणा देत त्याबद्दल जल्लोषही केला. शिवसेनेने ही दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना श्रध्दांजली असल्याचे म्हटले आहे. अनेक भागांत सकाळी नऊनंतर फटाके उडवण्यात आले. थेट फाशी दिल्याचीच बातमी बाहेर आल्याने त्याबद्दल कुतूहल होतेच, मात्र त्यापेक्षा समाधानाचा भाग अधिक होता. चौकाचौकात त्याची बराच वेळ चर्चा सुरू होती. संसदेवरील हल्ल्यातील अफझल गुरूच्याही फाशीची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणीही अनेकांनी केली.     
भरचौकात फाशी द्यायला हवी होती- हजारे
पारनेर/वार्ताहर- मुंबई येथील साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी, पाकिस्तानी अतिरेकी अजमल कसाबला फाशी दिल्यामुळे भारतीय न्याय व्यवस्थेवरील विश्वास वाढला आहे. मात्र, फाशी देण्याचा निर्णय उशिरा झाला आहे. आपल्या देशातील कायद्यामध्ये तरतूद नसली तरीही अशा अतिरेक्यांना भर चौकात विनाविलंब फाशी दिली पाहिजे. तसे केले तरच अतिरेकी, देशद्रोही कारवाई करणाऱ्यांवर जरब बसेल, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.