गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय तसेच बायोपार्कच्या कामास गती देण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नसून हा प्रकल्प लवकरात लवकर व्हावा यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याची ग्वाही पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी दिली. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय तसेच बायोपार्क प्रकल्पास शिवाजीराव मोघे यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.  या प्रकल्पाच्या संरक्षक भिंतीचे काम, निसर्ग पायवाट, संरक्षण चौकी, संरक्षण मनोरे, रोपवाटिका, जलसंवर्धन यावर २ कोटी ५० लाख रुपये खर्च झाले असून २०१२-१३ मध्ये १५ कोटीचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता त्यापैकी सध्या ७ कोटी ५० लाख रुपयाच्या निधीची आवश्यकता असून हा निधी लवकरच मिळेल आणि उर्वरित निधी सुद्धा मार्चच्या पूर्वी मिळवून देण्यात येईल, असेही मोघे यांनी सांगितले  येत्या २५ व २६ फेब्रुवारीला नागपुरात होणाऱ्या अ‍ॅडव्हाँटेज विदर्भच्या परिषदेत गोरेवाडा प्रकल्पाविषयी सादरीकरण करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. प्राणिसंग्रहालय व बायोपार्क स्थापन करण्याच्या परवानगीसाठी सर्वोच्च न्यायालयापुढे अर्ज दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. सध्या विभागीय व्यवस्थापक व सहाय्यक व्यवस्थापकासह २३ कर्मचारी महामंडळातर्फे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. वनविभागाने १९१४ हेक्टर वनक्षेत्र कर्मचाऱ्यांसह वनमहामंडळाकडे हस्तांतरित केले असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. गोरेवाडा वनक्षेत्राची सीमा ३३ किलोमीटर असून त्यापैकी पहिल्या टप्प्यात १९.८० कि.मी. संरक्षण भिंतीचे बांधकाम प्रस्तावित आहे. ६ कि.मी. भिंतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. १४.५०० कि.मी. भिंतीचे प्लिंथपर्यंत बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरित काम मार्च २०१३ पर्यंत पूर्ण होईल. गोरेवाडा तलावाच्या हद्दीवर ८ कि.मी. लांबीची निसर्ग पायवाट तयार करण्याचे काम प्रस्तावित असून त्यापैकी ५ कि.मी. निसर्ग पायवाटेचे काम पूर्ण झाले असल्याची माहितीही यावेळी पालकमंत्र्यांना देण्यात आली. बैठकीस व्यवस्थापकीय संचालक सर्वेशकुमार, डॉ. विजय आदमने व वनविकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.