महापालिकेत अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त, मुख्य लेखाधिकारी, सहायक संचालक नगररचना, कनिष्ठ अभियंता, तसेच लिपिक व सफाई कामगार, अशा विविध संवर्गातील ८८९ रिक्त पदभरतीचा आकृतीबंध मंजूर आहे. मात्र, वष्रेभरात या दृष्टीने ठोस पाऊल उचलले न गेल्याने मनपाच्या अधिकाऱ्यांना अतिरिक्त ताण सहन करावा लागत आहे. परिणामत: विविध प्रभागातील रस्ते, नाल्या व सफाईची कामे प्रलंबित आहेत.
२५ ऑक्टोबर २०११ रोजी चंद्रपूर पालिकेला महापालिकेचा दर्जा देण्यात आला. स्थानिक महापालिकेत विविध संवर्गातील नवीन १ हजार १९८ पदांच्या भरतीला तातडीने मंजुरी द्यावी, असा प्रस्ताव चंद्रपूर मनपाचे पहिले आयुक्त प्रकाश बोखड यांनी नगरविकास मंत्रालयाकडे पाठविला होता. मात्र, वारंवार तांत्रिक त्रुटी समोर करून तीन वेळा हा प्रस्ताव रद्द करण्यात आला. त्यानंतर चौथ्यांदा प्रस्ताव योग्य पध्दतीने पाठविल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विविध संवर्गातील ८८९ पदभरतीच्या आकृतीबंधाला मंजुरी प्रदान केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री चव्हाण यांनी मंजूर केलेल्या पदांमध्ये अतिरिक्त आयुक्त १, उपायुक्तांची २ पदे, सहायक आयुक्त ७ पदे, मुख्य लेखाधिकारी १, नगर सचिव १, वैद्यकीय अधिकारी आरोग्य १, वैद्यकीय अधिकारी स्वच्छता १, शहर अभियंता १, जलप्रदाय अभियंता १, सहायक संचालक नगररचना १, मुख्य अग्निशमन अधिकारी १, कनिष्ठ अभियंता व अभियंतांची १५ पदे , कर संकलन अधिकारी १, या महत्वाच्या पदांसोबतच सफाई कुली, सफाई महिला कामगार व सफाई कामगार आदि पदांचाही समावेश आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पदभरतीला मंजुरी मिळाल्याने मनपा वर्तुळात आनंदाचे वातावरण होते, तसेच उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त, सहायक आयुक्त व मुख्य लेखा अधिकारी ही काही महत्वाची पदे भरण्यातही आली. मात्र, उर्वरीत पदे अजूनही भरण्यात आलेली नाही.
दरम्यानच्या काळात अलीकडेच राज्यात सत्तांतर होऊन भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले. सुधीर मुनगंटीवार राज्यात अर्थमंत्री, तर खासदार हंसराज अहीर केंद्रात खते व रसायन मंत्री झाले. त्यामुळे मनपात तातडीने पदभरती होईल, असे सर्वाना वाटत होते. अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी मनपात पहिलीच बैठक घेऊन त्या दृष्टीने हालचालीही सुरू केल्या. मात्र, अजूनही या पदभरतीची प्रक्रिया सुरू झालेली नाही. परिणामत: अपुऱ्या कर्मचारी बळावर महापालिका क्षेत्रात सुरू असलेली कोटय़वधींची विकास कामे करतांना आयुक्त सुधीर शंभरकर व सात अभियंत्यांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागत आहे. आता तर तीन स्वतंत्र झोन असल्याने कामाचा ताण आणखीच वाढलेला आहे. त्यामुळे शहरातील रस्ते, नाल्या, सिमेंटीकरण, अतिक्रमण, अवैध बांधकाम व अन्य कामे मोठय़ा प्रमाणात प्रलंबित आहेत. शहर स्वच्छतेच्या दृष्टीने तर येथे सर्वत्र बोंबाबोंब आहे. शहरातील मुख्य भाजीबाजार असो की, सिव्हील लाईन प्रभाग सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसते. महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर पडणारा अतिरिक्त भार लक्षात घेता राज्यातील भाजप-सेना युती शासनाने तातडीने पदभरती सुरू करावी, अशीही मागणी नगरसेवकांनी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूर जिल्ह्य़ाची आढावा बैठक घेतांना महापालिकेची स्वतंत्र बैठक घेऊ, असे म्हटले आहे. त्यामुळे मनपा आयुक्त सुधीर शंभरकर व जिल्हाधिकाऱ्यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मागे लावून ही सर्व कामे करवून घ्यावीत अन्यथा, मनपातील ८८९ पदभरतीचा आकृतीबंध जैसे थे राहील. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष द्यावे, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी लावून धरली आहे.
दुष्काळात तेरावा महिना
मनपा उपायुक्त राजेश मोहिते यांची बदली झाली आहे. त्यामुळे उपायुक्ताचे आणखी एक रिक्त झाले आहे. अगोदरच अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरता असतांना कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. त्यामुळे कामात आणखी अडचणी निर्माण होत आहेत. दरम्यान, मोहिते यांच्या बदलीने रिक्त झालेल्या उपायुक्तपदाचा अतिरिक्त कारभार शहर अभियंता महेश बारई यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे.