वर्षभर विविध कलाप्रकारांचे धडे गिरवणाऱ्या शासकीय चित्रकला महाविद्यालयातील उमलत्या कलाकारांच्या चित्रकृती प्रदर्शनाला आजपासून प्रारंभ झाला. महाविद्यालयातील सुमारे ३०० विद्यार्थ्यांंच्या कलाकृती या प्रदर्शनात लावण्यात आल्या असून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. चित्रांपासून ते छायाचित्रांपर्यंत तर २डी डिझाईनपासून शिल्पांपर्यंत विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेतून साकारालेल्या विविध कलाकृती या प्रदर्शनात बघावयास मिळणार आहेत.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर प्रमुख पाहुणे तर महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रफुल्ल क्षीरसागर उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याशिवाय, प्रदर्शन अधिकारी प्रा.विनोद मानकर, कलावृंद समिती प्रमुख प्रा.सुभाष बाभुळकर, विद्यार्थी प्रतिनिधी ध्रुपद गाडे व विद्यार्थिनी प्रतिनिधी नूतन कवाडकर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी बोलताना बावनकुळे यांनी महाविद्यालयाला जिथे जिथे गरज पडेल त्या त्या कामात मदत करण्याचे आश्वासन दिले.
चित्रकला महाविद्यालयात विविध वर्षांत व अभ्यासक्रमांना शिकत असलेल्या रंगकला, उपयोजित कला, शिल्पकला व कलाशिक्षक प्रशिक्षण विभागातील विद्यार्थ्यांचे वार्षिक वर्गकाम या प्रदर्शनात मांडण्यात आले आहे. उद्घाटन समारंभात मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिके तसेच प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. या वार्षिक प्रदर्शनाकरिता शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या उपायोजित कलाप्रकारातील अव्वल तीनही पुरस्कार विद्यार्थिनींनी पटकावले असून प्रथम तीन पारितोषिकांसाठी अनुक्रमे समीक्षा ताथे, तृप्ती चुनोडकर व स्मृती सब्बनवार यांची निवड करण्यात आली आहे. प्रिटिंग विभागांतर्गत प्रथम व द्वितीय पुरस्कार रुचा बजाज व अंकित बिटले यांना रंगकामासाठी तर तृतीय पुरस्कार मिलिंद अटकाले यांना प्रिंट मेकिंगसाठी देण्यात आला.
कला शिक्षक प्रशिक्षणातील प्रथम तीन पुरस्कार मनीष बुचे, सूरज ढोके व सतीश शेरेकर यांनी प्राप्त केले. पदव्युत्तर फाईन आर्टस् विभागांतर्गत अनिरुध्द बेले, शीतल भोतमांगे, रश्मी शेलावत, गोपाल गडवे व प्रणिली सालोडकर यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. मौक्तिक काटे व अंबादास पायघन यांना शिल्पकलेची पारितोषिके देण्यात आली.