कारागृहातील २५ अधिकारी-कर्मचाऱ्यांना राज्य सरकार सन्मान पदक-प्रशस्तीपत्र देणार

कारागृहातील अतिरेकी, गुन्हेगारांच्या टोळ्यांवर अंकुश तसेच गैरप्रकार रोखून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या राज्यातील कारागृहातील २५ अधिकारी

कारागृहातील अतिरेकी, गुन्हेगारांच्या टोळ्यांवर अंकुश तसेच गैरप्रकार रोखून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या राज्यातील कारागृहातील २५ अधिकारी वा कर्मचाऱ्यांना सन्मान पदक व प्रशस्तीपत्र देण्याचा निर्णय राज्याच्या गृह खात्याने घेतला आहे.
राज्यातल्या कारागृह विभागातील केवळ दोन- तीनच अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची गणराज्य व स्वातंत्र्यदिनी राष्ट्रपती पदकासाठी निवड केली जाते. त्याशिवाय आता राज्य शासनातर्फे राज्यातील कारागृह विभागातील २५ अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मान पदक व प्रशस्तीपत्र दिली जाणार आहेत. मात्र, त्यासाठी काही निकष शासनाने निश्चित केले असून त्याचे कठोर पालन केले जाणार आहे. संपूर्ण सखोल माहिती संबंधित कारागृहाच्या अधीक्षकांना कारागृह उपमहानिरीक्षकांकडे व त्यांनी महानिरीक्षकांकडे ३० एप्रिलपूर्वी सादर करावी लागणार आहे. त्यांच्या अध्यक्षतेखालील समिती अंतिम निर्णय घेईल. मे किंवा जूनमध्ये सन्मान पदक निवड झालेल्यांची नावे घोषित केली जातील.
कारागृहातील अतिरेकी, गुन्हेगारी टोळ्यांच्या बंद्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवून त्यांच्या कारवायांवर अंकुश ठेवणे, बंद्यांच्या पलायन वा घातपात कटाची माहिती वेळीच मिळवून प्रतिबंध, हल्ल्याच्या घटनांवर प्रतिबंध, वेळोवेळी झडती घेऊन शस्त्रे, स्फोटके, अंमली पदार्थ, भ्रमणध्वनींच्या वापरावर प्रतिबंध आदींप्रकारे सुरक्षा मजबुत असावी. कारागृहात सुरक्षा, सुधारणा व इतर विविध योजनांसह वैशिष्टय़पूर्ण योजनांची अंमलबजावणी व्हावी. किमान दहा वर्षे नोकरी झालेली असावी. वाहन चालक असेल तर किमान दहा वर्षे विनाअपघात उत्कृष्ट सेवा असावी. महिला वा पुरुष कैद्यांच्या पुनर्वसनात उल्लेखनीय कामगिरी हवी. किमान पाच रोख बक्षिसे व पाच प्रशस्तीपत्रे, दहा वर्षांच्या गोपनीय अहवालात किमान पाचपेक्षा जास्त अत्युकृष्ट किंवा उत्कृष्ट तर शिल्लक अहवाल चांगले असावेत. कुठलीही शिक्षा झालेली नसावी. बेशिस्तीची नोंद नसावी. कुठलीही चौकशी प्रलंबित वा प्रस्तावित नसावी, आदी निकष असून राष्ट्रपती पदकासाठी केंद्र शासनाकडे तीनवेळा नावे पाठवूनही निवड न झालेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनातर्फे सन्मान चिन्ह दिले जाणार आहे.
राज्य शासनाने हा ३१ मार्चला निर्णय घेतला. योगायोग असा की, त्याच दिवशी नागपूरच्या कारागृहातून पाच कुख्यात न्यायाधीन बंदी पळून गेले. तेव्हापासून तेरा दिवसात ७५ भ्रमणध्वनी, अध्र्या किलोहून अधिक गांजा, मेमरी कार्ड, सीम कार्ड व पेन ड्राईव्ह सापडले. अधीक्षकासह एकूण दहाजण निलंबित झाले. या पाश्र्वभूमीवर यंदातरी सन्मान पदकांच्या यादीत नागपूर कारागृहाचे नाव अशक्यच दिसते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nagpur vidarbh news