उत्तर भारतात हिमवर्षांव आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या धुक्यामुळे होणारे अपघात हे दरवर्षीचे दृश्य असताना रामन विज्ञान केंद्रातील प्रदर्शनात एका विद्यार्थ्यांने हे अपघात कसे टाळता येईल, याचे प्रात्यक्षिकच प्रदर्शनात मांडले आहे.
रोजच्या जगण्यात सामान्य माणसांना अनेक समस्या भेडसावतात. त्या समस्यांची उकल सहज शक्य असल्याचे विद्यार्थ्यांनी प्रतिकृतींतून दाखवून दिले. थंडीच्या दिवसात सर्वत्र गारठा असतो. त्यातून निर्माण होणारे धुके आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातामुळे उत्तर भारतीय लोक जरा जास्तच धास्तावलेले असतात. अशात रेल्वे किंवा मोटार अपघाताचे प्रमाणही वाढते. अशा वातावरणात अपघात घडू नयेत म्हणून यशोदा विद्यालयाच्या यश सुरेश नितनवरे या विद्यार्थ्यांने बर्फाळ प्रदेशात सिग्नल देऊन अपघात टाळणारी प्रतिकृती तयार केली आहे. बाहेर सुकण्यास टाकलेले कपडे पावसामुळे भिजतात, हा सार्वत्रिक अनुभव टिपून दीपक चावडा या विद्यार्थ्यांने लागलीच ‘क्लोथ ड्राईंग मशिन’च्या माध्यमातून कपडे ओले होणे टाळता येऊ शकतात, हे सप्रमाण स्पष्ट केले. कुकडे ले-आऊटमधील न्यू अ‍ॅपोस्टोलिक विद्यालयाच्या साहील जाधव या विद्यार्थ्यांने टाकाऊ वस्तूंमधून धातू वेगळे करण्याचे तंत्र प्रदर्शनात मांडले. त्यामुळे कचरा वेचकांची पर्यायाने असंघटित कामगारांची संख्या कमी होईल, असे त्याला वाटते. रितिक माहुले याचे ‘कलेक्शन ऑफ इन्सेक्टल अ‍ॅनाटॉमी ऑफ स्नेक’ ही कीटकांचे विविध उपयोग सांगणारी माहिती पाहणाऱ्यांसाठी विशेष पर्वणी ठरली.
विजेचा प्रश्न हा राष्ट्रीय मुद्दा बनला आहे. त्यामुळे भारनियमन आणि उद्योगांना वीज न मिळणे ही नेहमीची ओरड असते. हा विषय देखील विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून सहज सोडवला आहे. रोज रस्त्यावरून धावताना गतिरोधकांचा सामना आपल्याला करावा लागतो. हे गतिरोधक सुद्धा वीज बनवण्यास उपयोगी पडू शकतात, हे गुरुनानक विद्यालयाच्या नीशा यादव या विद्यार्थिनीने स्पष्ट केले. सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक स्कुलच्या नितीश यादव, विनय द्विवेदी या विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील समस्यांना लक्षात घेऊन एका ठिकाणाहून माल दुसरीकडे वाहून नेण्यासाठी ‘सोलर कार्ट’ तयार केले. नंदनवनच्या गायत्री कॉन्व्हेंटच्या कृती दोडके आणि आदित्य तडस या विद्यार्थ्यांनी लक्षवेधक अशा प्रतिकृतींचे सादरीकरण करून सर्वानाच आश्चर्यचकित केले.
सत्यसाई विद्या मंदिरचा वैभव बानाईत याने तर चक्क मोक्षधामापासून वीज निर्मिती कशी करता येईल, याचे प्रात्यक्षिकच दाखवले. दाब देऊन वीज निर्मिती करता येते हेही प्रदर्शनात पाहायला मिळते.
विज्ञान प्रदर्शनात वर्तमानातील समस्या आणि त्यावर तोडगाही काढू शकतो, हे शालेय विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये विज्ञान व संशोधनात विद्यार्थ्यांची गोडी वाढावी म्हणून रामन विज्ञान केंद्र तत्परतेने प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्राच्या परिसरात शालेय विद्यार्थ्यांसाठी येत्या २४ डिसेंबपर्यंत प्रदर्शन भरवले आहे. त्याचे उद्घाटन इग्नूचे प्रादेशिक संचालक डॉ. पी. शिवस्वरूप आणि नागपूर विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. श्याम भोगा यांच्या उपस्थितीत पार पडले.
यावेळी केंद्राचे प्रकल्प समन्वयक विश्वनाथ जोशी उपस्थित होते.