‘युगपुरूष बाळासाहेब ठाकरे भवन’

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मूक संमतीने महापालिकेच्या मुख्य इमारतीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर झाला. सेना-भाजपच्या सदस्यांनीही त्यांच्यासाठी महत्वाच्या असलेल्या या विषयावर एका शब्दाचीही चर्चा केली नाही, हे विशेष!
मनपाच्या मुख्य इमारतीला सेनाप्रमुख ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव बाळासाहेब बोराटे यांनी दोन महिन्यांपूर्वीच दिला होता. त्यांच्यासह कोणालाही या ठरावावर बोलूच दिले गेले नाही. ठरावाचे वाचन झाले व महापौर शीला शिंदे यांनी विषय मंजूर झाला असे जाहीर करत पुढचा विषय वाचायची सूचना कर्मचाऱ्यांना केली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांसह सत्ताधारी सेना-भाजपचे सदस्यही यावेळी शांत बसून होते. कोणीही बोलायची इच्छादेखील व्यक्त केली नाही. मात्र, त्यांच्यातीलच काही सदस्य सभेनंतर बोलू न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त करत होते. या ठरावामुळे मनपाच्या मुख्य इमारतीचे नाव आता ‘युगपुरूष बाळासाहेब ठाकरे भवन’ असे होईल.
मनपा हद्दीबाहेर असलेल्या बुरूडगाव परिसराला पाणी पुरवठा करण्याचा विषय चर्चेला होता. संग्राम जगताप, गणेश भोसले, संगीता खरमाळे, अंबादास पंधाडे, सुभाष लोंढे आदी सदस्यांनी त्या भागाला पाणी पुन्हा सुरू करावे असे मत व्यक्त केले. त्यावर शिवाजी लोंढे, दिलीप सातपुते यांनी केडगावचे पाणी कमी होणार नाही याची काळजी घ्या, अशी सूचना केली. त्यावरून बराच गदारोळ झाला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सेना-भाजप युतीवर टिका केली. त्यांचा सामना करायचा सोडून सेनेचे संभाजी कदम यांच्यासह सर्व नगरसेवक शांतता पाळण्यात दंग होते. भाजपच्या लोंढे व पारखी यांनी एकहाती सामना करत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना तोंड दिले.  विनित पाऊलबुद्धे यांनी मध्येच नवनागापूर, तपोवन व त्या परिसरालाही पाणीपुरवठा करावा अशी मागणी केली. शिवाजी लोंढे यांनी त्यावर पाणीपट्टी जमा करणाऱ्या मनपा हद्दीतील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची अडचण होणार नाही असा रास्त मुद्दा उपस्थित केला. मात्र, त्यांनाच गप्प बसवत बहुसंख्य नगरसेवकांनी बुरूडगावला पाणी देण्यास मंजुरी दिली. तत्पूर्वी त्यांची थकीत पाणीपट्टी जमा करून घ्यावी असे ठरवण्यात आले. राज्यात सर्व ठिकाणी आपले पाणी आपल्याजवळ ठेवण्याची भांडणे सुरू असताना स्वत:चे पाणी हद्दीत नसलेल्यांना देणारी नगर मनपा ही अत्यंत उदार आहे अशी उपरोधाची प्रतिक्रिया यावर लोंढे यांनी व्यक्त केली.
पुरातत्व खात्याच्या जाचक नियमांवरही सभागृहात बराच वेळ चर्चा झाली. त्यांच्या सर्व नियमांचे पालन करत बसलो तर नगरमध्ये एकही नवी इमारत उभी राहणार नाही अशी टिका करत सर्वच सदस्यांनी ठराव करून हे नियम बदलावेत अशी मागणी केली. ते नियम नाहीत तर केंद्र सरकारने संपूर्ण देशासाठी केलेला कायदा आहे, त्याचे पालन करावेच लागेल असे स्पष्ट व ठाम मत उपायुक्त डोईफोडे व नगररचनाकार विश्वनाथ दहे यांनी व्यक्त केले. फार तर त्या कायद्याची शहर विकासाला कशी अडचण आहे त्याचा ठराव करून तो दिल्लीला पुरातत्व खात्याला पाठवावा, तसेच एक शिष्टमंडळ तयार करून त्यांनी दिल्लीत जाऊन त्या खात्याच्या सचिवांची भेट घ्यावी, असा सल्ला प्रशासनाने दिला. त्यानुसार ठराव करण्यात आला.
नगर महोत्सव व पंचरंग युवक मंडळ यांना सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मनपाच्या वतीने देणगी देण्याचा विषय मंजूर झाला. महापौर श्रीमती शिंदे यांच्याबरोबरच उपमहापौर श्रीमती काळे यांनीही व्यासपीठावरूनच अनेक प्रश्न उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरले. पत्र पाठवूनही त्याची दखल घेत नसल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गोंधळ घालणाऱ्या नगरसेवकांना गप्प करत त्यांनी सभेचे कामकाजही काही वेळ चालवले. नगरसचिव दुर्गे निवृत्त झाल्यामुळे त्यांच्या जागेवर सहायक आयुक्त संजीव परशरामे बसले होते. त्यांच्याकडे आता त्यांच्या मूळ प्रभाग अधिकारी या पदाबरोबरच प्रभारी सहायक आयुक्त, प्रभारी उपायुक्त, प्रभारी नगरसचिव अशा तब्बल तीन पदांचे प्रभारी कार्यभार असून तेही आता दिर्घ रजेवर जाण्याच्या विचारात आहेत.