स्त्री-पुरुष संबंधांचे गूढ आदिम व चिरंतन आहे. बहुधा आदिमानवाच्या अवस्थेत असल्यापासूनच या नात्याचा वेध संवेदनशील माणूस घेऊ लागला असावा. त्याकाळी स्त्री-पुरुष समानता होती असं म्हटलं जातं. पुढं कालौघात पुरुषानं स्त्रीला शारीरिक ताकद आणि नीतीकल्पना, धर्मादी गोष्टींचा बागुलबुवा उभा करून चार भिंतींच्या आत कोंडलं. तिला आपली गुलाम केलं आणि तिनं कायम आपल्या अंकित राहायला हवं असा दंडक घातला. तरीही सत्त्व आणि ‘स्व’त्वासाठी झगडणाऱ्या स्त्रिया अगदी पुराणकाळापासून अस्तित्वात आहेतच. आपल्या हक्कांसाठी पुरुषांबरोबरचा त्यांचा लढा तेव्हापासून अव्याहत सुरू आहे. अगदी आजच्या स्त्री-पुरुष समानतेच्या काळातही हा संघर्ष जारी आहे. मात्र, आज स्त्री आपल्या सर्व तऱ्हेच्या हक्कांबाबतीत जागरूक झालेली आहे. ते प्राप्त करण्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजायचीही तिची तयारी आहे. किंबहुना, स्त्री-पुरुष नात्यातलं राजकारण खेळण्याइतकी ती आज स्वतंत्र झालेली आहे.  
स्त्री-पुरुष नातेसंबंधांचा वेध अनादिकाळापासून सुरू आहे. कुणी तो साहित्यातून घेत आहे, तर कुणी आपल्या कलेतून! कुणी त्याला शास्त्रकाटय़ाची कसोटी लावतं, तर कुणी या संबंधांमध्ये मानवी शरीरातील हार्मोन्सच्या घडामोडींचं महत्त्व शास्त्राधारे अधोरेखित करतं. स्त्री-पुरुषांतील प्रेम, आकर्षण, साहचर्य, एकरूपता वा मतभेद यासंदर्भात जीवशास्त्रीयदृष्टय़ा कोणते घटक कार्य करतात, याबद्दलचं शास्त्रीय संशोधन आज समोर आलं आहे. फक्त ‘मन’ नावाच्या प्रकरणाची मात्र अद्यापि उकल व्हायची आहे. ती एकदाची झाली, की स्त्री-पुरुष नात्यातलं गूढ संपेल. असो.
हे झालं स्त्री-पुरुष संबंधातलं आजचं वास्तव! ‘नाटक’ या माध्यमातूनही या नात्याचा मागोवा प्राचीन काळापासून घेतला जात आहे. ‘नाटय़शास्त्र’कार भरतमुनींपासून भास, कालिदास ते आजच्या आधुनिक नाटककारांपर्यंत असंख्यांनी स्त्री-पुरुषांतील गूढ संबंधांचा विविधांगी वेध घेतलेला आहे. कधी जाणतेपणी, तर कधी कथेच्या संदर्भानं! मराठी नाटकांतील स्त्री-पुरुष संबंधांच्या चित्रणाचा मागोवा घेणारं एक ‘नाटय़’कोलाज नुकतंच रंगभूमीवर आलं आहे.. त्याचं नाव ‘नांदी’! ऋषिकेश जोशी लिखित-दिग्दर्शित या रंगाविष्काराची निर्मिती चार नाटय़संस्थांनी एकत्रितरीत्या केली आहे. ‘नांदी’मध्ये दहा नाटकांतील स्त्री-पुरुष संबंधांचं चित्रण असलेले प्रवेश निवडण्यात आले आहेत. त्यांतून या नात्यात कोणती स्थित्यंतरं झाली, हे दाखविण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हे सगळं एका सूत्रात गुंफण्यासाठी साक्षात् भरतमुनींनाच पाचारण करण्यात आलं आहे. अन् त्यांची गाठ चॅनेलवरील रिअ‍ॅलिटी शोमधील एका सूत्रसंचालिकेशी घालून देण्यात आली आहे; जेणेकरून त्यांच्यामधील संवाद-विसंवादातून हे नाटय़कोलाज आकारास येईल! अधेमधे मराठी रंगभूमीच्या आजच्या स्थितीचं वास्तव चित्रफितीद्वारे पाहुण्या कलावंतांच्या माध्यमातून मांडण्याची शक्कल लढवून विरंगुळ्याचीही चोख व्यवस्था करण्यात आली आहे. मराठी रंगभूमीवर हा नवा प्रकार आहे.  
‘अभिज्ञान शाकुंतलम्’ या कालिदासकृत नाटकातील दुष्यन्त-शकुंतला यांच्यातील दरबारी प्रवेशानं या रंगाविष्काराची सुरुवात होते. गर्भवती शकुंतला राजा दुष्यन्ताच्या दरबारात येऊन त्यानं आपला पत्नी म्हणून स्वीकार करावा अशी मागणी करते. पण तिच्या बोटातली खुणेची अंगठी हरवल्यानं दुष्यन्त विश्वामित्री पवित्रा घेऊन तिला पत्नी म्हणून स्वीकारायला साफ नकार देतो. स्त्री-पुरुष संबंधांतली ही चिरंतन व्यथा! अविनाश नारकर व अश्विनी एकबोटे यांनी शैलीदार अभिनयातून ती पेश केली आहे. दोघांनीही संवादोच्चारात वरची, काहीशी कर्कश्श पट्टी लावल्यानं शकुंतलेची ही व्यथा तितकीशी भिडत नाही.  
अण्णासाहेब किलरेस्करांच्या ‘संगीत सौभद्र’मध्ये रुक्मिणीचा रुसवा कृष्ण चतुरपणे कसा दूर करतो, हे दाखवलंय. यातली ‘प्रिये पहा..’सारखी सदाबहार पदं आणि प्रसाद ओक यांची लोभस रुक्मिणी यामुळे हा प्रवेश श्रवणीय व प्रेक्षणीयही झाला आहे. अजय पूरकर यांचं गाणं गतरम्यतेच्या झुल्यावर प्रेक्षकांना झुलवतं.  
कृ. प्र. खाडिलकरांच्या ‘किचकवध’मध्ये युधिष्ठिर, द्रौपदी आणि भीम यांच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्यवाद्यांच्या मवाळ-जहाल भूमिकेसंबंधात भाष्य असलं तरी स्त्री-पुरुष संबंधांतील विवेचनातून ते येतं. हा प्रवेश म्हणावा तितका परिणामकारक होत नाही. तेजस्विनी पंडित, चिन्मय मांडलेकर आणि अजय पूरकर या तिघांनाही प्रवेशाचा आत्मा सापडलेला नाही. चिन्मय मांडलेकर भीमाच्या भूमिकेत असते तर.. तर कदाचित हे घडू शकलं असतं असं उगीचच वाटून गेलं.
राम गणेश गडकऱ्यांच्या ‘एकच प्याला’मधील व्यसनाधीन सुधाकराची पतिव्रता पत्नी सिंधू आणि तिची सखी गीता यांच्यातला संवाद स्त्रीच्या बंडखोरीचा वानवळा होय. सीमा देशमुख यांनी सिंधूचं शालीन, सात्विक रूप, तर स्पृहा जोशी यांनी गीताची तडफदार बंडखोरी प्रत्ययकारीतेनं व्यक्त केली.
वसंत कानेटकरांच्या ‘अश्रूंची झाली फुले’मध्ये अध:पतित प्रो. विद्यानंद आणि त्यांची सुविद्य पत्नी यांच्यातील भावानुबंध पुन्हा सिंधूशीच नातं सांगणारे! अविनाश नारकर यांनी प्रो. विद्यानंदांचं बाह्य़ात्कारी कठोर रूप आणि अश्विनी एकबोटे यांनी त्यांची सतीसावित्री पत्नी उत्तम साकारली आहे.
वि. वा. शिरवाडकरांच्या ‘नटसम्राट’मधील आप्पासाहेब बेलवलकर आणि त्यांची पत्नी कावेरी यांच्यातलं हृद्य नातं स्त्री-पुरुष संबंधांतील फूलकोमल भावना अधोरेखित करतं. शरद पोंक्षे (आप्पासाहेब) आणि सीमा देशमुख (कावेरी) यांनी पती-पत्नीच्या नात्यातलं समंजस सौहार्द तरलतेनं अभिव्यक्त केलं आहे.
विजय तेंडुलकरांनी ‘सखाराम बाइंडर’मध्ये स्त्री-पुरुष संबंधांतला अस्पर्श कोपरा चितारला आहे. वांड पुरुषाला कह्य़ात ठेवण्यासाठी स्त्रिया प्रकृतीपरत्वे कुठले मार्ग अवलंबतात, आपल्या पतित आयुष्यातही त्या त्यांच्या परीनं कशी नैतिकता जपतात, हे त्यात दर्शवलं आहे. तेजस्विनी पंडित यांनी चंपाचं तडकभडक व्यक्तिमत्त्व अचूक पकडलं आहे. तर सीमा देशमुख यांनी सौम्य प्रवृत्तीच्या लक्ष्मीचं व्यावहारिक शहाणपण नेमकेपणी दाखवलं आहे.
जयवंत दळवींच्या ‘बॅरिस्टर’मध्ये स्त्री-पुरुष नात्याचे बंध मनोविश्लेषणाच्या अंगानं येतात. विधवा राधाला बॅरिस्टर नव्या आयुष्याची स्वप्नं दाखवतात खरी; परंतु ती पूर्ण करण्याचं धारिष्टय़ व खंबीरपणा मात्र त्यांच्यातल्या आनुवंशिक कचखाऊपणामुळे त्यांच्याकडे नाही. राधेचं दुपेडी दु:ख त्यामुळे अधिकच गहिरं होतं. शरद पोंक्षे यांनी बॅरिस्टरची वेडसरतेकडे झुकलेली मनोवस्था, तसंच राधा झालेल्या अश्विनी एकबोटेंचा सर्वस्व उद्ध्वस्त होत असतानाचा आकांत मनाला स्पर्शून जातो.  
चं. प्र. देशपांडे यांच्या ‘बुद्धिबळ आणि झब्बू’मध्ये स्त्री-पुरुष संबंधांमधलं खुलं चोरटेपण शब्दमैथुनातून व्यक्त होतं. या नाटकाची खासीयत ही, की प्रत्यक्षात काहीही घडत नसताना ते घडल्याचा आभास मात्र निर्माण होतो. नुकतंच लग्न झालेल्या आपल्या मैत्रिणीचा सहवास हवाहवासा वाटत असला तरीही तिचा नवरा बॉक्सर आहे, हे वास्तव दृष्टीआड न करता तिच्याशी वरकरणी छुपं, परंतु उघड फ्लर्टिंग करणारा प्रियकर नुसत्या बोलण्यातूनच तिच्याशी जवळिक साधू बघतो. प्रसाद ओक आणि तेजस्विनी पंडित यांना या नाटकाचा गाभाच कळलेला नाही, हे या प्रवेशात स्वच्छ जाणवतं. केवळ शब्दांतून जे व्यक्त करायचं, ते आणखीन जवळिकीतून व्यक्त केल्यास नाटकाचा मूळ आशयच बाद ठरतो. दिग्दर्शक हृषिकेश जोशी यांनाही हे नाटक न कळल्याचं ते द्योतक आहे.
प्रशांत दळवी यांचं ‘चाहूल’ हे आजच्या चंगळवादावर भाष्य करणारं नाटक. नीतिमूल्यं वगैरे सोयीस्कररीत्या नजरेआड करण्याची वृत्ती आजच्या व्यक्तिवादी पिढीत बळावली आहे. परंतु युक्तिवादाच्या पातळीवर मात्र यातली स्त्री पुरुषाला कशी कोंडीत पकडते हे यात दाखवलं आहे. धारदार संवादांतून उलगडणारा हा आशय, त्यातलं भाव-विचारांचं सूक्ष्म अन् तीक्ष्ण द्वंद्व चिन्मय मांडलेकर (मकरंद) आणि स्पृहा जोशी (माधवी) यांनी ताकदीनं व्यक्त केलं आहे.
चॅनेलवरील कार्यक्रमाची मठ्ठ, पण चलाख सूत्रसंचालिका आणि आजची घुसमटलेली स्त्री यांच्यातला अंतर्विरोध स्पृहा जोशी यांनी अचूक टिपला आहे. हृषिकेश जोशी यांनी भरतमुनींच्या रूपात रंगाविष्कार पुढं नेताना किस्से व शेरेबाजीत दाखवलेला टायमिंग सेन्स लाजवाब!    
खरं तर स्त्री-पुरुष संबंधांतला पुढचा टप्पा रेखाटणाऱ्या ‘व्हाइट लिली आणि नाइट रायडर’चाही यात अंतर्भाव असायला हवा होता; तरच स्त्री-पुरुष नात्यातलं  आजचं वास्तव पूर्णाशानं मांडलं गेलं असतं.
लेखक हृषिकेश जोशी यांनी आठवणींच्या म्युझियमच्या संकल्पनेभोवती हा नाटय़कोलाज सुंदररीत्या गुंफला आहे. त्याला रिअ‍ॅलिटी शोची फोडणी देताना मधे मधे फोनवरून दर्शकांच्या प्रश्नांद्वारे आजच्या रंगभूमीसंदर्भातील अज्ञानाधिष्ठित आपमतलबी अंध:कारावरही त्यांनी टीकाटिप्पणी केली आहे. नाटय़प्रवेशांच्या कालमर्यादेने मागचे-पुढचे संदर्भ गायब होत असल्यानं प्रेक्षकांना त्यांचा आस्वाद घेण्यात अडचणी येऊ शकतात. ही सगळी नाटकं प्रेक्षकांना माहीत आहेत असं इथं गृहीत धरलं गेलं आहे. स्त्री-पुरुष संबंधांवरचं हे नाटय़कोलाज सादर करण्याची कल्पना अत्यंत स्तुत्य असली तरीही लेखक हृषिकेश जोशी हे दिग्दर्शक म्हणून मात्र अनेक प्रवेशांत कमी पडल्याचं जाणवतं. अर्थात रंगभूमीवरचा एक ‘प्रयोग’ म्हणून याकडे पाहायला हवं आणि त्याचं स्वागतच करायला हवं.      
प्रदीप मुळ्ये यांनी सूचक, सांकेतिक आणि वास्तववादी नेपथ्याच्या त्रिविध मिश्रणातून या प्रयोगाला आल्हादक देखणेपण आणि पृष्ठभूमी दिली आहे. त्यांच्या प्रकाशयोजनेनं प्रत्येक प्रवेशानुरूप भावपरिपोष झाला आहे. राहुल रानडे यांनी प्रवेशांची निकड जाणून घेत संगीतातून त्यांना सघनता प्राप्त करून दिली आहे. गीता गोडबोले यांनी उचित वेशभूषा आणि रंगभूषेद्वारे प्रत्येक प्रवेशास अस्सलपण दिलं आहे.  रेखा सावंत यांची नाटकानुसारी केशभूषाही महत्त्वाचीच! दीपक भावे यांनी ध्वनिचित्रफितींतून विरंगुळ्याचे क्षण जिवंत केले आहेत.