जलदगती गोलंदाजांमध्ये एकहाती सामना फिरविण्याची क्षमता असल्याने अशा गोलंदाजांचा शोध घेण्याची मोहीम महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची सुरूवात नाशिक जिल्ह्य़ापासून करण्यात आली असल्याची माहिती येथे आयोजित जिल्हा संघटनेच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
अशा प्रकारची शोध मोहीम ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी एक सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे या मोहिमेत दुर्गम भागातील आणि आर्थिक परिस्थितीने कमकुवत खेळाडूंनाही सहभागी होता यावे यासाठी त्या त्या तालुक्याच्या ठिकाणी चाचणी शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हा संघटनेच्या वतीने या जलदगती गोलंदाज शोध मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचे नियोजन पूर्ण करण्यात आले आहे. त्यासाठी संघटनेकडून निवड समितीचे चार पथक तयार करण्यात येऊन ते सर्व तालुक्यांच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन तेथील खेळाडूंची प्राथमिक निवड करणार आहेत. त्यांची नाशिक येथे होणाऱ्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मुख्य निवड प्रक्रियेत सहभागी करून घेण्याच्या दृष्टिने पूर्वतयारी करण्यात येणार आहे. निवड प्रक्रियेत १५ ते २५ या वयोगटातील खेळाडू सहभागी होऊ शकतील. निवड चाचणीसाठी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेकडून पांडुरंग साळगावकर हे २२ व २३ मार्च रोजी नाशिक येथे येणार आहेत. ही निवड चाचणी जिल्ह्य़ातील खेळाडूंसाठी अतिशय महत्वाची असून या निवड चाचणीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी संघटनेचे प्रतिनिधी अथवा तालुक्यातील स्थानिक प्रतिनिधींशी संपर्क साधून त्या त्या तालुक्याच्या ठिकाणी निश्चित तारखेस उपस्थित राहण्याचे आवाहन नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे करण्यात आले आहे.
त्यानुसार सहा मार्च रोजी पेठ तालुक्यासाठी चाचणी झाली. सात मार्च रोजी सकाळी १० वाजता मालेगाव तालुक्यासाठी पोलीस कवायत मैदान, आठ मार्च रोजी सकाळी नऊ वाजता नाशिक तालुक्यासाठी सय्यदपिंप्री मैदान, इगतपुरीसाठी वाडीवऱ्हे येथील स्पोर्टस् स्कुलचे मैदान, दिंडोरीसाठी कांदा मार्केट मैदान, सटाण्यासाठी बागलाण अकॅडमी, दुपारी दोन वाजता सिन्नर तालुक्यासाठी बारागावपिंप्री रोड येथील कानडी मळा, कळवणसाठी शरद पवार पब्लिक स्कूलचे मैदान, देवळ्यासाठी राजे छत्रपती क्रीडांगण गुंजाळनगर, नऊ मार्च रोजी येवल्यासाठी सकाळी आठ वाजता मुक्तानंद विद्यालयाचे मैदान, सकाळी नऊ वाजता चांदवडसाठी मनमाड चौफुली, त्र्यंबकेश्वरसाठी हरसूल महाविद्यालयाचे मैदान, सकाळी ११ वाजता नांदगावसाठी मनमाड येथील आंबेडकर मैदान, १० मार्च रोजी सुरगाण्यासाठी सकाळी नऊ वाजता अलंगुण येथील शहीद भगतसिंग आश्रमशाळा आणि ११ मार्च रोजी सकाळी नऊ वाजता निफाडसाठी टाऊनशिप येथील एचएएल मैदान, याप्रमाणे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.