अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या सिंहस्थाच्या प्रलंबित कामांवरून साधु-महंत शासन आणि प्रशासनावर रोष प्रगट करत असल्यामुळे या कामांवर सुक्ष्मपणे नजर ठेवून ती मुदतीत मार्गी लागावीत यासाठी नेमलेल्या समन्वय अधिकाऱ्यांचा लाभ होत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. सिंहस्थ कामांची संख्या भलीमोठी असल्याने आणि वेगवेगळ्या विभागांचा एका कामाशी संबंध येत असल्याने ही नेमणूक करताना त्या त्या विभागांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला गेला. सुक्ष्म पातळीवर कामांवर नजर ठेवण्यासाठी साधारणत: दोन महिन्यांपूर्वी नियुक्त केल्या गेलेल्या अधिकाऱ्यांमुळे प्रत्येक काम विहित मुदतीत पूर्णत्वास जाईल असा प्रयत्न केला जात आहे.
दर बारा वर्षांनी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यास १४ जुलै २०१५ रोजी ध्वजारोहणाद्वारे सुरुवात होत आहे. लाखो भाविकांचा सहभाग असणाऱ्या सिंहस्थासाठी राज्य शासनाने २३७८.७८ कोटींचा आराखडय़ाला मान्यता दिली होती. प्रारंभी या कामांसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध होईल या आशेवर असलेल्या शासकीय विभागांना पुढील काळात स्वत:कडील निधी खर्च करण्यास सांगण्यात आले. विविध कारणांस्तव विकास कामांना गती पकडण्यास विलंब झाला. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजन व अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समिती, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समिती, विभागीय, जिल्हास्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर, जिल्हास्तरावर कुंभमेळा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. वेगवेगळ्या समित्यांमार्फत वारंवार सिंहस्थ कामांचा आढावा घेण्यात येत आहे. सिंहस्थाच्या अनुषंगाने रस्ते, साधुग्राम उभारणी, वाहनतळाची व्यवस्था, वीज वितरण, गोदा काठावर घाटांचे बांधकाम, सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सीसी टीव्ही कॅमेरे बसविणे, भाविकांसाठी वाहतूक व्यवस्था, त्यासाठी नव्या बसस्थानकांची उभारणी अशी शेकडो कामे करण्यात येत आहेत. ही कामे प्रस्तावित करताना नाशिकला झुकते माप तर त्र्यंबकेश्वरकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची साधु-महंतांची भावना आहे. त्यातही कामांचा दर्जा चांगला नसून शासन आणि प्रशासन त्र्यंबकेश्वरकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप साधु-महंतांनी वारंवार केला होता.
या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर, दोन महिन्यांपूर्वी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी कुंभमेळ्याच्या व्यवस्थापनाकामी करावयाच्या सुक्ष्म नियोजनासाठी समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. तात्पुरत्या स्वरुपात करावयाची वाहनतळाची व्यवस्था, भाविकांसाठी वाहतूक व्यवस्था, साधुग्रामचे गटनिहाय नियोजन, विद्युत व्यवस्था, सुरक्षिततेसाठी लोखंडी जाळ्या बसविणे, सीसी टीव्ही कॅमेरा यंत्रणा उभारणी आणि पोलीस निवास व्यवस्था, गर्दीच्या वेळी भाविकांना काही थांबविता येईल अशा मोकळ्या जागांचे नियोजन, स्वच्छता व आरोग्य व्यवस्था, पाणी पुरवठा, आपत्ती व्यवस्थापन आदींसाठी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांची ‘समन्वय अधिकारी’ म्हणून नेमणूक करण्यात आली. ही नियुक्ती करताना नाशिक व त्र्यंबक येथे स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. अचानक घेण्यात आलेल्या या निर्णयाचा धसका काही अधिकाऱ्यांनी घेतला आहे. या माध्यमातून उपरोक्त कामांची जबाबदारी त्या त्या अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली.
सिंहस्थ कामांवर देखरेख ठेवण्यास उपरोक्त निर्णयाचा लाभ झाल्याचे महसूल आयुक्त एकनाथ डवले यांनी नमूद केले. पायाभूत सुविधांच्या कामाव्यतिरिक्त सिंहस्थासाठी तात्पुरत्या स्वरुपात १३ ते १४ प्रकारची वेगवेगळी कामे करावी लागणार आहेत. या कामांचे सुक्ष्म पध्दतीने नियोजन करणे, विहित मुदतीत ती पूर्ण होतील यावर लक्ष ठेवणे, त्या कामात येणाऱ्या अडचणींचे निराकरण करणे आदी जबाबदारी कामनिहाय समन्वय अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. लोखंडी जाळ्या बसविणे व तत्सम स्वरुपाची काही कामे पुढील काळात संबंधितांमार्फत करण्यात येणार आहे. रस्त्यांच्या दोन कामात मध्यंतरी काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यात लखमापूर रिंग रोडचा समावेश होता.
३१ मे पर्यंत या रस्त्याचे काम पूर्णत्वास नेण्याचे नियोजन आहे. सिंहस्थाशी संबंधित सर्व कामे विहित वेळापत्रकानुसार व्हावीत यादृष्टीने प्रशासन प्रयत्न करत असल्याचे डवले यांनी सांगितले.