बाल येशू यात्रेनिमित्त १४ व १५ फेब्रुवारी रोजी नाशिक-पुणे रस्त्यावरील तसेच डांबरीकरणाच्या कामामुळे मोडक पॉइंट ते एबीबी चौक ते महिंद्रा चौक या दोन मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन पोलीस यंत्रणेने केले आहे.
नाशिक-पुणे रस्त्यावरील उपनगर येथे १४ व १५ फेब्रुवारी रोजी बाल येशू यात्रा होणार आहे. या वेळी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. शनिवार व रविवार या कालावधीत या मार्गावरील संपूर्ण वाहतूक सकाळी सहा ते रात्री ११ या कालावधीत बंद राहील. या मार्गावरून जाणारी सर्व वाहने, माल वाहतूक करणारी वाहने ही पुणे, सिन्नर बाजूकडून येणारी आणि द्वारका सर्कल वा मुंबई बाजूकडे जाणारी वाहने बिटको चौक, देवळाली गाव, पाथर्डी फाटा मार्गे जातील किंवा बिटको चौक, जेल रोड, नांदूर नाका, जत्रा चौफुली मार्गे जातील. द्वारका चौकाकडे पुणे, सिन्नर बाजूकडून येणारी वाहने फेम सिनेमा सिग्नल, ड्रीमसिटी, नारायण बापूनगर, सैलानी बाबा चौक, जेल रोड मार्गाकडून जातील. यात्रा संपल्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाईल.
दरम्यान, मोडक पॉइंट ते एबीबी सर्कल ते महिंद्रा चौक या रस्त्याचे दोन्ही बाजूंकडील रस्त्यांचे डांबरीकरण एप्रिलअखेर पूर्ण करावयाचे आहे. यासाठी मोडक पॉइंट ते एबीबी सर्कल ते महिंद्रा चौकपर्यंतचा रस्ता दोन महिन्यांहून अधिक कालावधीसाठी बंद राहणार आहे.
या कालावधीत एकेरी वाहतूक सुरू राहील. मात्र या मार्गावरील वाहनांची संख्या लक्षात घेता कोंडी होऊ नये यासाठी  वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. रविवारपासून रात्री १० ते सकाळी ६ या कालावधीत ही वाहतूक मोडक पॉइंट ते एबीबी सर्कल ते महिंद्रा चौक, महिंद्रा चौक ते एबीबी सर्कल ते मोडक पॉइंट एकेरी सुरू राहील. वाहनचालक पर्यायी रस्ता म्हणून मोडक पॉइंटकडून त्र्यंबक रोडने सातपूरकडे जाणारी वाहतूक ही गडकरी सिग्नलकडून चांडक सर्कलमार्गे भवानी चौकातून उंटवाडी रोडने सिटी सेंटर मॉल, एबीबी सर्कलवरून पुढे जाईल. तसेच, एबीबी ते महिंद्र चौक दरम्यानचे काम सुरू असताना सातपूर बाजूकडे जाणारी वाहतूक ही सातपूरकडून येणाऱ्या रोडने दोन्ही बाजूंची जाणारी व येणारी वाहतूक सुरू राहील.
याशिवाय महिंद्रा चौक ते एबीबी सर्कल ते मोडक पॉइंट या मार्गाचे काम सुरू राहील, त्या वेळी सदर मार्गाची वाहने महिंद्रा चौक ते एबीबी सर्कलकडून मोडक पॉइंटकडे जाणारी वाहतूक डावीकडून महात्मानगर मार्गे जेहान सर्कल मार्गे गंगापूर रोडने इतरत्र जाईल. महिंद्रा चौक ते एबीबी सर्कल दरम्यानचे काम सुरू असताना नाशिककडे जाणारी वाहतूक ही सातपूरकडे येणाऱ्या रोडने दोन्ही बाजूंची जाणारी व येणारी वाहतूक सुरू राहील.