शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या रोगप्रतिबंधक व सामाजिक औषध-वैद्यकशास्त्र विभागातर्फे २२ ते २४ जानेवारी दरम्यान ‘महिलांचे आरोग्य, सद्यपरिस्थिती आणि भविष्यातील योजना’ या विषयावर ४० वी राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली असून देशभरातील प्रतिनिधी आणि संबंधित विषयातील तज्ज्ञ उपस्थित राहणार असल्याची माहिती विभाग प्रमुख डॉ. अरुण हुमणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात होणाऱ्या तीन दिवसीय परिषदेचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ पदमश्री डॉ. विजय भटकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां डॉ. राणी बंग, पदमश्री डॉ. श्रीनिवास वैश्य, डॉ. शेखर राजदेरकर, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यावेळी उपस्थित राहणार आहे. गेल्या पाच दहा वर्षांत प्रसुतीच्यावेळी महिलांना होणाऱ्या विविध आजाराचे प्रमाण वाढले आहे. प्रसुतीच्यावेळी महिलांच्या मृत्यूचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. महिलांच्या आरोग्याची सध्याची परिस्थिती आणि भविष्यात त्यावर काय उपाययोजना करता येईल, यावर या कार्यशाळेत चर्चासत्र आणि विविध तज्ज्ञांची भाषणे आयोजित करण्यात आली आहे.
देशभरातील ८०० च्या जवळपास प्रतिनिधी उपस्थित राहतील. सर्चच्या प्रमुख डॉ. राणी बंग यांचे ‘महिलांच्या समस्या आणि कुपोषित बालक’ या विषयावर भाषण होणार आहे. देशभरातील ३० पेक्षा अधिक संघटना या परिषदेत सहभागी होणार आहेत. तीन दिवसात १४ वेगवेगळ्या विषयावरील चर्चासत्र आयोजित करण्यात आले. या परिषदेत स्त्री आरोग्य आणि इतर आरोग्य समस्या’ या विषयावर ४५० शोधनिबंध सादर केले जाणार आहे. त्यावर चर्चा केली जाणार आहे. त्यातील उत्कृष्ट शोधनिबंधला पारितोषिक देण्यात येणार आहे. २४ जानेवारीला दुपारी ४ वाजता डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या उपस्थितीत परिषदेचा समारोप होणार आहे.
या परिषदेत वेगवेगळ्या विषयावर चर्चा केल्यानंतर त्यावर अहवाल तयार करणार आहे आणि तो केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडे पाठविण्यात येणार असल्याचे डॉ. हुमणे यांनी सांगितले. दरम्यान परिषदेच्या एक दिवस आधी रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधशास्त्र विभागातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला असून या दिवशी वेगवेगळ्या विषयावर चर्चासभ आयोजित करण्यात आले असल्याचे डॉ. हुमणे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला डॉ. अशोक जाधव, डॉ. सुरेश उघडे, डॉ. सुभाष ठाकरे, डॉ. सोनाली पाटील उपस्थित होते.