लाखनी येथील विदर्भ कला, वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी एका रेल्वे प्रवाशाला जीवनदान दिले. ही घटना सेवाग्राम येथे घडली.
लाखनी येथील विदर्भ कला महाविद्यालयाची भूगोल विभागाची शैक्षणिक सहल शेगाव येथे गेली होती. परतीच्या प्रवासात विद्यार्थी शालिमार एक्स्प्रेसने सेवाग्राम रेल्वे स्थानकावर पोहोचले. काही वेळातच नवी दिल्लीवरून चेन्नईला जाणारी एक्स्प्रेस रेल्वे स्थानकावरून निघत असताना जे.बालकृष्णन हे प्रवासी त्या गाडीतून खाली कोसळले. यावेळी फलाटावर असलेल्या कविता व सविता खराबे या जुळ्या बहिणींनी धावत जाऊन त्या प्रवाशाला उचलले. काही विद्यार्थी या एक्स्प्रेसमध्ये धावत चढले व साखळी ओढून गाडी थांबविली. इतक्यात रासेयोच्या शिबिरातून आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलेल्या कविता व सविता खराबे यांनी जे.बालकृष्णन यांना फीट आलेल्या अवस्थेतून सामान्य स्थितीत आणले. दरम्यान, त्या प्रवाशाचे कागदपत्र तपासले असता तो नवी दिल्लीवरून चेन्नईकडे जात होता, हे ओळखून विद्यार्थिनींनी तिकीट तपासणीस व रेल्वे कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून त्या प्रवाशाला त्याच गाडीने सुखरूप रवाना केले. विदर्भ महाविद्यालयाच्या प्रा.डॉ.अमित हुकुमचंद गायधनी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रियंका आग्रे, अस्मिता पाखमोडे, कल्याणी फंदे, चित्रांगणा पाखमोडे, सचिन फंदे,मनीष झिंगरे, नागसेन शेंडे व इतर यांनी या बचाव कार्यासाठी सहकार्य केले.