मुंबईतील रेल्वे स्थानकांमधील रेल्वे डबे आणि स्थानक यांच्यातील उंचीचा मुद्दा ऐरणीवर आलेला असताना, नवी मुंबईतील स्थानकांचे उत्तरदायित्व स्वीकारणाऱ्या सिडको प्रशासनाच्या गावीदेखील हा मुद्दा नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच वल्र्ड क्लास रेल्वे स्थानके असल्याचा दावा करणाऱ्या सिडकोच्या नवी मुंबईतील स्थानकांवर सहा इंचापेक्षा जास्त फरक असल्याने एका तरुणाला वाशी येथील दोन क्रमांकाच्या फलाटावर आपला पाय दुखापतग्रस्त करून घ्यावा लागला.
नवी मुंबईतील रेल्वे वाहतूक ही भारतीय रेल्वे आणि सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आली आहे. सिडकोने यात ६७ टक्के खर्च केला असून स्थानकांचा कारभार स्वत:कडे ठेवला आहे. नवी मुंबईतील पहिल्या मानखुर्द-पनवेल आणि दुसऱ्या ठाणे-पनवेल या दोन मार्गात एकूण ३० स्थानके असून, सिडकोने या सर्व स्थानकांचे उत्त्तरदायित्व स्वीकारले आहे. त्यामुळे रेल्वे डबे आणि फलाट यामधील उंची पाहण्याची जबाबदारीदेखील सिडकोची आहे.  काही दिवसांपूर्वी गौतम साळवे या तरुणाचा पाय वाशी फलाट दोनवरून प्रवास करताना दुखापतग्रस्त झाला. सर्वसाधारपणे रेल्वे डबे आणि फलाट यांतील उंची सहा इंच ठेवण्याचा भारतीय रेल्वे कायद्यात आहे.
मध्य रेल्वेने आपल्या ७४ स्थानकांची दुरुस्ती करण्यास घेतली आहे, पण याकडे सिडकोने सर्रास दुर्लक्ष केले असून, येथील बहुतेक स्थानकांची उंची सहापेक्षा जास्त आणि १८ पेक्षा कमी आहे. त्यामुळे वाशी येथील फलाट क्रमांक दोनवरील स्थानकाची उंची १२ इंच आहे. सिडकोने गेली अनेक वर्षे या स्थानकांची डागडुजी केलेली नाही. सहा कोटी रुपये खर्चाचे कंत्राट काढण्यात आले आहे, असे सिडकोचे अधिकारी सांगतात पण ते काम अद्याप प्रत्यक्षात सुरू झालेले नाही.