ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार व स्थानिक नेत्यांनी गावातील आपले वजन राखले. पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर, राज्यमंत्री प्रकाश सोळंके, गटनेते रमेश आडसकर यांच्यासह पक्षाच्या आमदारांची बहुतांशी ग्रामपंचायतीवर पकड असल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले. ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी झाली. मात्र, काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील ग्रामपंचायती खेचून घेण्यात भाजपने यश मिळविले. आष्टीत माजी आ. भीमराव धोंडे यांच्या ‘परिवर्तन’ ला मात्र मतदारांनी फारशी साथ दिली नाही.
बीड जिल्ह्य़ातील ७०५ ग्रामपंचायतींपैकी बिनविरोध निघालेल्या ग्रामपंचायती सोडून ६१२ ग्रामपंचायतींचे निकाल मंगळवारी लागले. आगामी सार्वत्रिक निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून आपल्या भागात वर्चस्व निर्माण करण्यासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी आणि विरोधी भाजप, शिवसेनेच्या नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या गटाने मतदारसंघातील बहुतांशी ग्रामपंचायतींवर आपले वर्चस्व कायम ठेवले, तर प्रतिष्ठेच्या झालेल्या चौसाळा ग्रामपंचायत निवडणुकीत सतीश लोढा यांच्या कार्यकर्त्यांनी यश मिळविले. मांजरसुंबा ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या हातातून निसटली. परळी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत मुंडे कुटुंबातील फाटाफुटीमुळे राष्ट्रवादीच्या खात्यात भर पडली. भाजपचे खासदार गोपीनाथ मुंडे यांचे जन्मगाव असलेल्या नाध्रा ग्रामपंचायतीसह ३१ ग्रामपंचायती ताब्यात घेऊन राष्ट्रवादी समर्थक आमदार धनंजय मुंडे यांनी आघाडी घेतली. भाजपने ३५ ग्रामपंचायतींवर आपले वर्चस्व ठेवले आहे. काही ग्रामपंचायतीत स्थानिक आघाडय़ांनी विजय मिळवला आहे. अंबाजोगाई तालुक्यात भाजपने आपले वर्चस्व टिकवून ठेवले आहे. केज तालुक्यातही राष्ट्रवादीने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. पक्षाचे नगटनेते रमेश आडसकर यांच्या गटाने केज, धारूर आणि अंबाजोगाई तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायतीत विजय मिळवून आपला प्रभाव कायम ठेवला आहे. गेवराई तालुक्यातील राष्ट्रवादीचे आमदार बदामराव पंडित व आमदार अमरसिंह पंडित या काका-पुतण्यांचे जन्मगाव असलेल्या दैठण ही ग्रामपंचायत यावेळी नव्याने राष्ट्रवादीत दाखल झालेले विधान परिषद सदस्य अमरसिंह पंडित यांच्या ताब्यातून काढून घेण्यात बदामराव पंडित यांनी यश आले आहे.