आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत कल्याण येथे आयोजित राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यात मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी पक्षातील घरभेद्यांचा खरपूस समाचार घेत कार्यकर्त्यांच्या मनात असलेल्या खदखदीला वाट मोकळी करून दिली. त्यांच्या या घरच्या आहेराने घायाळ झालेल्या पक्षप्रमुखांना अखेर नेत्यांची बैठक बोलावून हितशत्रुत्व मोडीत काढण्याची ग्वाही कार्यकर्त्यांसमोर द्यावी लागली.
ठाणे जिल्ह्य़ात शिवसेनेच्या खालोखाल कार्यकर्त्यांची फळी असूनही गटबाजीमुळे राष्ट्रवादीस अपेक्षित यश मिळत नाही, या वस्तुस्थितीला कथोरेंनी जाहीर व्यासपीठावरून पहिल्यांदाच तोंड फोडले. त्यांनी जाहीरपणे कुणाचीही नावे घेतली नसली तरी मेळाव्यात उपस्थित प्रत्येक कार्यकर्त्यांला ते कुणाबद्दल बोलताहेत हे माहिती होते. तसेच त्या नेत्यांचे चेहरेही बघण्यासारखे झाले होते. सध्या ठाणे जिल्ह्य़ात राष्ट्रवादीच्या बाजूने जमेच्या मानल्या जाणाऱ्या बाबींमध्ये आमदार किसन कथोरे यांचा प्रामुख्याने समावेश होतो. केवळ मुरबाडमध्येच नव्हे तर अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांत त्यांना मानणारा फार मोठा वर्ग आहे. या भागात मोठय़ा संख्येने असलेल्या कुणबी आणि आगरी समाजात त्यांचा चांगला संपर्क आहे. मात्र केवळ दरबारी राजकारण करण्यात धन्यता मानणाऱ्या पक्षातील नेत्यांना कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या कथोरेंचे मोठेपण कधीच रुचले नाही. त्यामुळे मुरबाड बदलापूरमधील त्यांच्या विरोधकांना रसद पुरविण्यात या पक्षविरोधकांनी कायम धन्यता मानली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे जिल्ह्य़ात अक्षरश: पानिपत झाले आहे. नमो लाटेचा तडाखा इतका जबरदस्त होता की कथोरेंच्या मुरबाड-बदलापूरमध्येही काँग्रेसच्या विश्वनाथ पाटील यांना आघाडी मिळविता आलेली नाही. अशा परिस्थितीत विधानसभा निवडणुकीत विजयाच्या निर्धाराने उतरायचे असेल तर आधी पक्ष विरोधकांना श्रेष्ठींनी आवरावे, हाच कथोरेंच्या टीकेचा मथितार्थ होता.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp melava
First published on: 08-07-2014 at 06:42 IST