राष्ट्रवादी काँग्रेसने हाती घेतलेल्या मिशन-२०१४ अंतर्गत पुण्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि निवडक लोकप्रतिनिधींची चिंतन बैठक शनिवारी आयोजित करण्यात आली असून प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची या बैठकीत प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दुष्काळी परिस्थितीवरील उपाययोजना आणि निवडणुका असे दोन विषय बैठकीच्या कार्यपत्रिकेवर आहेत.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी सुरू केली असून या तयारीला मिशन-२०१४ असे नाव देण्यात आले आहे. निवडणुकांच्या तयारीसाठी सध्या चिंतन बैठका सुरू असून पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्य़ातील प्रमुख पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची बैठक शनिवारी बोलावण्यात आली आहे. दीडशे पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत. निवडणुकांची तयारी तसेच पक्षसंघटना आदी विषयांवर उपस्थितांचे मनोगत बैठकीत समजून
घेतले जाईल. तसेच राज्यातील दुष्काळी परिस्थिती व त्यावरील उपाययोजना या महत्त्वपूर्ण विषयावरही बैठकीत चर्चा होणार आहे. हिंजवडी येथे ही बैठक होत आहे.
राज्यातील सर्व जिल्ह्य़ांमध्ये अशाप्रकारच्या बैठकांचे आयोजन राष्ट्रवादीतर्फे करण्यात येत आहे. आगामी निवडणुकांची व्यूहरचना निश्चित करण्यासाठी या बैठकांचा उपयोग पक्षाला होईल, असे सांगण्यात आले.