येणाऱ्या वर्षांत महिलांना सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या मध्य रेल्वेवर महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या मुद्दय़ावरून मात्र बराच गोंधळ आहे. पश्चिम रेल्वेच्या धर्तीवर मध्य रेल्वेवरही महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याला महिलांचाच विरोध आहे, असे मुख्य जनसंपर्क अधिकारी अतुल राणे यांनी सांगितले. मात्र, महिला संघटनांनी हे विधान खोडून काढले आहे. रेल्वेच्या तासाभराच्या प्रवासात ‘प्रायव्हसी’ कोणालाच नको आहे. त्यापेक्षा मध्य रेल्वेने महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षेची काळजी घ्यावी, अशी मागणी प्रवासी संघटनांमधील महिला करत आहेत.
पश्चिम रेल्वेवरील एका गाडीतील महिलांच्या डब्यात प्रायोगिक तत्त्वावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. येत्या वर्षांत जास्तीत जास्त महिला डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा मानसही पश्चिम रेल्वेने व्यक्त केला आहे. मात्र, मध्य रेल्वेने अद्याप एकाही महिला डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले नाहीत. पश्चिम रेल्वेवर हा प्रयोग यशस्वी झाला, तरच मध्य रेल्वेवर त्याची अमलबजावणी करण्यात येईल, असे राणे यांनी सांगितले होते.
त्याचबरोबर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना महिलांचाच विरोध आहे, असेही राणे यांनी सांगितले होते. मात्र प्रवासी संघटनांमधील महिलांनी या विधानावर जोरदार आक्षेप घेतला आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी घेतल्या जाणाऱ्या निर्णयाला महिला विरोध करणारच नाहीत. मध्य रेल्वेला सीसीटीव्ही कॅमेरे बसवायचे नसल्यास, त्यांनी तसे स्पष्टपणे सांगावे. त्यांच्या निर्णयांचे बिल महिलांच्या नावावर फाडू नये, असे उपनगरीय प्रवासी संघटनेच्या महिला प्रतिनिधी लता अरगडे यांनी सांगितले. सध्या महिलांच्या डब्यात मानवी विष्ठा पसरवून ठेवण्याचे विकृत आणि किळसवाणे प्रकार पुन्हा एकदा सुरू झाले आहेत. रेल्वे सुरक्षा दल किंवा रेल्वे पोलीस या दोघांनाही या विकृत व्यक्तींचा छडा लावणे शक्य होत नाही. सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यानंतर तरी विकृत मनोवृत्तीच्या या व्यक्तींचा शोध लागून त्यांना कडक शासन होईल, अशी अपेक्षाही त्यांनी वर्तवली.
दरम्यान, पश्चिम रेल्वेवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा उपक्रमही फारसा यशस्वी ठरला नसल्याचे रेल्वेतील सूत्रांकडून समजते. कॅमेरा बसवताना ‘लाइव्ह फुटेज’, ‘सेव्हड् फुटेज’ अशा कोणत्या प्रकारचा कॅमेरा बसवायचा, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्याचप्रमाणे या कॅमेऱ्यातील चित्रीकरणही सुस्पष्ट नसल्याचे समजते.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Jan 2014 रोजी प्रकाशित
‘महिला डब्यांत सीसीटीव्ही कॅमेरा हवाच’
येणाऱ्या वर्षांत महिलांना सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या मध्य रेल्वेवर महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या मुद्दय़ावरून मात्र बराच गोंधळ आहे.

First published on: 02-01-2014 at 08:44 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Need cctv camera in women coaches of railway