देशातील तब्बल ६० टक्के लोक शेती करीत असून, ३०५ दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर शेती व शेतकऱ्यांच्या समस्याही प्रचंड आहेत. त्यामुळे आपण अन्नधान्याची निर्यात करीत असलो तरी शेती सुधारल्याशिवाय देश सुधारणार नाही. तसेच, वाढती लोकसंख्या विचाराधीन घेऊन शेतीतंत्रज्ञान बांधापर्यंत पोहोचले पाहिजे, असे कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. किसन लवांडे यांनी सांगितले.
स्वातंत्र्यसेनानी दादा उंडाळकर यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त कराड तालुक्यातील उंडाळे येथे दहाव्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. आमदार विलासराव पाटील-उंडाळकर, दादा उंडाळकर स्मारक समितीचे कार्यकारी विश्वस्त प्राचार्य प. ता. थोरात, पंचायत समितीचे सभापती विठ्ठलराव जाधव, जिल्हा शेती विकास अधिकारी विजय माईंनकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष हणमंतराव चव्हाण यांची उपस्थिती होती. यावेळी शेतीनिष्ठ पुरस्काराने दहा शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
डॉ. लवांडे म्हणाले, की राळेगणसिध्दी, हिवरे बाजारची चर्चा होते. ही गावे निश्चितच बदलली मात्र, उंडाळकरांनी विविध संस्था, शासकीय विभाग, जिल्हा बँक व लोकांना एकत्र घेऊन गावेच्या गावे बदलली आहेत. समन्वयातून झालेले हे कार्य राज्यभर व देशभर पोहोचणे आवश्यक आहे.
शेती उत्पादन वाढीसाठी ग्रामीण भागात भरवल्या जाणाऱ्या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून मोठे कार्य साधले जात आहे. कृषी प्रदर्शने, शेतीच्या प्रयोगशाळा महत्त्वाच्या असून, पोटाला पोटभर अन्न न मिळणाऱ्यांची संख्याही देशात मोठी असल्याने आपण केवळ इस्राईल तंत्रज्ञान शेतीत किती आणि प्रत्यक्षात किती आत्मसात करतो हा चिंतनाचा विषय असल्याचे ते म्हणाले.
विलासराव पाटील-उंडाळकर म्हणाले, की शेती करणाऱ्याला आज कुणी मुलगी देत नाही. तरी, ही मानसिकता बदलण्यासाठी शेतीला उद्योगाची परिभाषा मिळवून देणे आणि शालेय अभ्यासक्रमातूनच विद्यार्थ्यांला शेतीच्या विषयावर मार्गदर्शन लाभणे काळाची गरज आहे.