महाराष्ट्राने आजवर नदीचे स्वच्छ पाणी कायम स्वच्छ राखण्यासाठी काहीच उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे नद्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शोषण, प्रदूषण व अतिक्रमणामुळे नद्या मृत झाल्या आहेत. त्यामुळे राज्यात ज्याप्रमाणे पाणी धोरण आहे त्याप्रमाणे नदी धोरणही राबवले जावे, असे अभ्यासपूर्ण मत महाराष्ट्र राज्य जलबिरादरीचे अध्यक्ष सुनील जोशी यांनी मांडले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एन्व्हायरो फेंड्र्स नेचर क्लबच्या पुढाकाराने व कराड नगरपालिकेच्या सहकार्याने आयोजित ‘कृष्णा नदी वाचवूया’ या परिसंवादात जोशी बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार श्रीनिवास पाटील होते. तर पर्यावरणतज्ज्ञ डॉ. संदीप श्रोत्री, डॉ. रवींद्र व्होरा, तहसीलदार सुधाकर भोसले, नगराध्यक्षा प्रा. उमा हिंगमिरे, सामाजिक वनीकरणाचे शैलेंद्रकुमार जाधव, टेंभू पाणी योजनेचे उपकार्यकारी अभियंता व्ही. एच. फाळके, एन्व्हायरोचे अध्यक्ष जालिंदर काशीद, उपाध्यक्ष प्रकाश खोचीकर यांची उपस्थिती होती. राज्यात पाणी धोरणाप्रमाणे नदी धोरण राबवले जावे या ठरावाबरोबरच कृष्णा नदी वाचवण्यासाठी राज्याबरोबरच कर्नाटकमध्येही जनजागृती करावी. टेंभूचे पाणी जास्त काळ न थांबवता काही दिवसांच्या अंतराने सोडून पुन्हा अडवावे असे ठराव चर्चासत्रात करण्यात आले.
श्रीनिवास पाटील म्हणाले की, कृष्णा नदीचे खळाळणारे पाणी टेंभू योजनेने अडवण्यात आल्याने पाण्यात जीवजंतू वाढतात. सांडपाणी त्यात मिसळल्याने नदीचे पाणी प्रदूषित होते. शुध्द पाणी पिण्यास मिळाले पाहिजे हा प्रत्येकाचा हक्क आहे. त्यामुळे त्यावर तातडीने उपाययोजना करावी. टेंभू योजनेचे पाणी ठरावीक दिवसानंतर सोडावे आणि पुन्हा साठवावे. त्यामुळे पाण्यातील जीवजंतू मरून पाणी स्वच्छ राहू शकेल. मलकापूर नगरपंचायत, कृष्णा रुग्णालयाचे सांडपाणी नदीत मिसळत असेल तर त्यांना सूचना द्याव्यात. त्यांनी ते पाणी प्रक्रिया करूनच नदीत सोडावे.
डॉ. रवींद्र व्होरा डॉ. संदीप श्रोत्री यांचीही भाषणे झाली. नगराध्यक्षा हिंगमिरे यांनी पर्यावरणाची शपथ दिली. प्रास्ताविक जालिंदर काशीद यांनी केले. प्रकाश खोचीकर यांनी आभार मानले. सह्याद्री साखर कारखाना, कृष्णा साखर कारखाना, कृष्णा वैद्यकीय संशोधन केंद्र, सामाजिक वनीकरण, ग्रामसेवक, कराड नगरपालिका, मलकापूर नगरपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक चर्चासत्राला उपस्थित होते.