किरकोळ विक्री क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीला विरोध आणि केंद्राच्या नव्या ‘फार्मा पॉलिसी’ च्या विरोधात ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनने आज पुकारलेल्या एक दिवसीय ‘बंद’ला विदर्भात चांगला प्रतिसाद मिळाला. बंदमुळे शासकीय आणि खाजगी रुग्णांलयातील रुग्णांना औषध न मिळाल्याने अनेकांची गैरसोय झाली. असोसिएशनतर्फेआकस्मिक सेवा सुरू ठेवण्यात आली होती परंतु, अनेक लोकांना औषधांसाठी वणवण फिरावे लागल्याचे चित्र शहरात दिसून आले. आजच्या बंदमुळे विदर्भात ८ ते १० कोटीची उलाढाल ठप्प झाल्याचा दावा नागपूर नागपूर ड्रगिस्ट केमिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
केंद्र शासनाच्या चुकीच्या औषध धोरणामुळे विक्रेत्यांना गेल्या काही वर्षांत व्यवसाय करणे कठीण झाले आहे. तसेच नफ्यात देखील कमतरता आल्यामुळे औषध विक्रेत्यांना तोटा सहन करावा लागत आहे. सरकारच्या धोरणाविरोधात संपाची हाळी देण्यात आली होती. त्याला प्रतिसाद देण्यासाठी विदर्भातील विविध जिल्ह्य़ातील औषधांची दुकाने दिवसभर बंद राहिली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) आणि इंदिरा गांधी  वैद्यकीय रुग्णालयातील (मेयो) मधील अनेक रुग्णांना संपाचा फटका बसला. औषध विक्रेत्यांचा बंद असल्याची माहिती रुग्णालयाना असताना डॉक्टरांनी ‘प्रिस्किप्शन’ देत रुग्णांना बाहेरुन औषधे आणायला लावली. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना नाराजी व्यक्त करीत विभाग प्रमुखांकडे तक्रार केल्याची माहिती मिळाली. मेडिकलमधील औषध दुकानांमध्ये औषधे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आल्यामुळे बाहेर भटकण्याची वेळ रुग्णांच्या आप्तांवर आल्याचे समजते. दरम्यान आज असोसिएशनच्या नागपूर शाखेतर्फे सकाळी गांधीबागमधील संस्थेच्या कार्यालयासमोर सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

असोसिएशनचे अध्यक्ष रवी गोयल ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाले, नागपूर शहरात ३ हजार २०० तर विदर्भात ८ हजार ४०० हजारच्या जवळपास औषधांची दुकाने असून सर्व दुकानदार ‘बंद’मध्ये सहभागी झाले होते. बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला असा दावा करून राज्य आणि केंद्र सरकारने याची दखल घ्यावी आणि मागण्या मान्य कराव्या, असेही गोयल म्हणाले. आमची लढाई ही नागरिकांविरुद्ध नाही तर प्रशासनाच्या विरुद्ध आहे. केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशने गांधीबागमध्ये सोख्या भवनजवळील संस्थेच्या कार्यालयात बंद असताना सामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून सामाजिक भान ठेवत औषध मिळावी यासाठी आपात्कालिन व्यवस्था केली असून अनेकांना औषधे देण्यात आली. शासनाने औषध विक्रेत्यांच्या मागण्यांवर विचार केला नाही येत्या काळात बेमुदत संप पुकारून आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी दिला.

More Stories onएलबीटीLBT
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Needy patient got heavy hit due to chemist strike
First published on: 11-05-2013 at 03:42 IST