शहरातील सिद्धार्थ उद्यानात दीप्ती वाघिणीने रविवारी जन्म दिलेल्या नवजात बछडय़ाचा जंतुसंसर्गामुळे मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास मृत्यू झाला.
सकाळी हा बछडा निपचित पडल्याचे पालिकेचे कर्मचारी खलिल शेख यांच्या लक्षात आले. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलविण्यात आले. त्यांनी केलेल्या तपासणीत ‘अ‍ॅक्यूट व्हायरल अ‍ॅनथ्रॅट’ या विषाणूचा संसर्ग बछडय़ाला झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, या घटनेनंतर दीप्ती वाघीणही अस्वस्थ झाली. मंगळवारी तिचा आहारही रोजच्या पेक्षा कमी झाल्याचे उद्यानातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. गेल्या आठवडयात भानुप्रिया वाघिणीचा मृत्यू झाल्यानंतर लगेचच दीप्ती वाघिणीने बछडय़ाला जन्म दिल्याने देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी विशेष काळजी घेतली होती. मात्र, सकाळी बछडा मरण पावल्याचे कळल्यानंतर डॉ. जे. एन. भुजबळ व डॉ. व्ही. एस. भालेराव यांच्या पथकाने तपासणी केली. बछडय़ाला जंतुसंसर्ग झाल्याचे मत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नोंदविले.