नवीन कायद्यानुसार महापालिकेच्या स्थायी समितीवर नव्या आठ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्याला सभागृहाने मंजुरी दिली. उरलेल्या आठ सदस्यांची निवड १ मार्चला करण्यात येणार असून त्याच दिवशी स्थायी समितीच्या नव्या अध्यक्षांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात येईल. महापालिकेच्या नवीन कायद्यानुसार स्थायी समितीच्या १६ सदस्यापैकी आठ सदस्य ईश्वर चिठ्ठीने बाहेर पडल्यानंतर महापालिकेची तिजोरी कोणाच्या हाती जाईल याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. उर्वरित आठ सदस्यांचेही राजीनामे घेण्यात आले होते. त्यामुळे आजचा आटापिटा करावा लागला. नागपूर विकास आघाडीने नरेंद्र नगर प्रभागाचे नगरसेवक अविनाश ठाकरे यांची स्थायी समितीच्या अध्यक्षपदी निवड केल्याने याविषयावर आज पडदा पडला. त्यांच्या नावाची  घोषणा १ मार्चला केली जाईल.
 शुक्रवारी झालेल्या महापालिकेच्या सभेत नव्या आठ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या नावांना सभागृहात मंजुरी देण्यात आली. या सदस्यांमध्ये नागपूर विकास आघाडीचे अविनाश ठाकरे (भाजप) राजेश घोडपागे (भाजप), रिता मुळे (भाजप) वंदना इंगोले (अपक्ष) आणि विषया खोब्रागडे (मनसे), काँग्रेसचे प्रशांत चोपडा, बहुजन समाज पक्षाचे किशोर गजभिये, शिवसेनेचे गट नेते सुरेश तळवेकर या आठ सदस्यांचा समावेश आहे. भाजपने उर्वरित दोन नावेही घोषित केली असून त्यात माया इवनाते आणि देवेंद्र मेहर यांचा समावेश आहे. उर्वरित सहा सदस्यांची नावे संबंधित पक्ष जाहीर करणार करतील. स्थायी समितीच्या अध्यक्षपदी अविनाश ठाकरे यांची निवड करण्यात आली असली त्याची अधिकृत घोषणा १ मार्चला करण्यात येणार असल्याचे सत्तापक्ष नेते प्रवीण दटके यांनी जाहीर केले. नव्या सदस्यांची नियुक्ती ही दोन वर्षांसाठी करण्यात आली आहे.  
दरम्यान स्थायी समितीवर कोणाची वर्णी लागणार यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून महापालिकेत रस्सीखेच सुरू होती. बाल्या बोरकर, भूषण शिंगणे आणि सुधाकर कोहळे यांच्या नावाची चर्चा होती मात्र यापैकी कोणाचीही वर्णी स्थायी समितीवर लावण्यात आली नाही. ठाकरे यांचे नाव आठ दिवस आधीच निश्चित झाले असले तरी आज सकाळी भाजपच्या कोअर कमेटीच्या झालेल्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. जुन्या कायम असलेल्या आठ सदस्यांचा कार्यकाळ २८ फेब्रुवारीपर्यंत राहणार आहे. प्रफुल्ल गुडधे, राजू लोखंडे, अलका दलाल, भाग्यश्री कानतोडे, रवींद्र डोळस, हर्षला जयस्वाल, असलमखान, सरोज बहादुरे हे सदस्य ईश्वर चिठ्ठठीने निवृत्त झाले होते तर दयाशंकर तिवारी, राजू थूल, सतीश होले, पुरुषोत्तम हजारे, मनीषा वानखेडे, परिणय फुके, सुजाता कोंबाडे, प्रगती पाटील हे सदस्य कायम राहिले असले तरी त्यांना २८ फेब्रुवारीला राजीनामा द्यावा लागणार आहे.  
स्थायी समितीवर शिवसेनेकडून अल्का दलाल यांच्या जागी जुनी मंगळवारी प्रभागातील शिवसेनेच्या नगरसेविका शीतल घरत यांचे नाव जवळपास निश्चित करण्यात आले होते. पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असताना ऐनवेळेवर गट नेते बंडू तळवेकर यांनी स्थायी समितीवर स्वत:ची वर्णी लावल्याने त्यांनी पक्षाचा आदेश मोडला असल्याची प्रतिक्रिया पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केली. शीतल घरत या प्रथमच नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. या संदर्भात संपर्क साधला असताना त्यांनी नाराजी व्यक्त करून पक्षाच्या नेत्यांशी या संदर्भात चर्चा करणार असल्याचे सांगितले.