‘झलक दिखला जा’ या नृत्य रिअ‍ॅलिटी शोचे नवे पर्व एक जूनपासून सुरू होत असून कथ्थक गुरू पं. बिरजू महाराज आणि या कार्यक्रमाची परीक्षक व अभिनेत्री माधुरी दीक्षित यांची नृत्य जुगलबंदी हे यंदाच्या पर्वाचे खास आकर्षण ठरणार आहे.
नृत्य कलावंतांबरोबरच विविध वाहिन्या, सिनेमा इत्यादी क्षेत्रातील  गाजलेल्या आणि नवोदित अशा कलावंतांना नृत्याच्या तालावर थिरकायला लावून स्पर्धा घेण्यात येणारा ‘झलक दिखला जा’ हा कार्यक्रम सुरुवातीपासून लोकप्रिय ठरला. आता कलर्स वाहिनीवरून या रिअ‍ॅलिटी शोचे नवे पर्व १ जूनपासून सुरू होत आहे.
 माधुरी दीक्षित, करण जोहर आणि रेमो डिसूझा हेच या वेळीही परीक्षक असतील. परंतु, स्पर्धकांमध्ये यंदा सुप्रसिद्ध गायक शान, अभिनेत्री-मॉडेल आरती छाब्रिया, टीव्ही स्टार श्वेता तिवारीसह विनोदवीर सुरेश मेनन, आणि इंडिया हॅज गॉट टॅलेण्ट या रिअ‍ॅलिटी शोचे विजेते ठरलेले सोनाली व सुमंत यासारखे कलावंत नृत्य करणार आहेत.
अभिनेत्री जॅकलिन फर्नाडिस आणि ‘काय पो चे’द्वारे रूपेरी पडद्यावर आगमन करणारा अभिनेता सुशांत सिंग राजपूत सर्व स्पर्धकांची ओळख करून देण्याबरोबरच रिअ‍ॅलिटी शोमध्ये नृत्य सादरीकरणही करणार  आहेत.
माधुरी दीक्षित यंदाही कार्यक्रमाची परीक्षक म्हणून काम पाहणार असली तरी या पर्वात ती सुप्रसिद्ध नृत्य गुरू पं. बिरजू महाराज यांच्यासमवेत ‘झलक दिखला जा’च्या मंचावर नृत्याविष्कार सादर करणार आहे हे यंदाचे वैशिष्टय़ ठरणार आहे.  कथ्थक गुरू बिरजू महाराज आणि माधुरी यांच्या नृत्याची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे.