नवी मुंबईचा ‘क्वीन नेकलेस’ अशी ओळख असणाऱ्या पामबीच मार्गावर दिवसेंदिवस वाढणाऱ्या अपघातांविषयी समाजात जनजागृती होण्यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने सर्व वाहनचालकांसह विद्यार्थ्यांना एक १५ मिनिटांची चित्रफीत दाखविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे २४ डिसेंबर रोजी किल्ले गावठाण येथे झालेल्या कंटेनर-कार धडकेत तीन तरुण जागीच ठार झाले. त्या अपघाताचे दोन काटकोनातून पालिकेच्या सीसी टीव्हीने टिपलेले लाईव्ह फुटेज पोलिसांकडे आहेत. ते या चित्रफितीत प्रकर्षांने दाखविण्यात येणार आहे.
राज्यात वाहतूक पोलीस व प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने रस्ते सुरक्षा सप्ताह सुरू झाला आहे. पूर्वी एक आठवडाभर पाळण्यात येणारा हा सप्ताह अलीकडे सप्ताह म्हणून असला तरी पंधरवडा म्हणून पाळला जातो. या काळात पोलीस आणि आरटीओ मोठय़ा प्रमाणात रस्ते सुरक्षेविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न करतात. उद्याचे वाहनचालक म्हणून विद्यार्थ्यांना या नियमांची माहिती करून दिली जाते. यावेळी पोलिसांनी आदेश बांदेकरसारख्या अनेक सेलिब्रेटीजना जाहिरातीमध्ये जागा दिली आहे. राज्यात अशा प्रकारचे विविध उपक्रम या काळात सुरू असताना नवी मुंबई पोलिसांनी एक वेगळी संकल्पना मांडली आहे. नवी मुंबई पोलीस उपायुक्त विजय पाटील (वाहतूक) यांच्या कल्पकतेतून एक चित्रफीत तयार केली जात आहे. त्यात वर्षांत पामबीच तसेच सायन-पनवेल महामार्गावर घडलेल्या प्रमुख अपघातांचे चित्रीकरण दाखविण्यात येणार आहे. नवी मुंबई पालिकेने शहरातील ८६ ठिकाणी २७२ सीसी टीव्ही कॅमेरे लावले आहेत. त्यात त्या ठिकाणावरील प्रत्येक हालचाल टिपली जात आहे. या कॅमेऱ्यांनी चित्रित केलेल्या भीषण अपघातांचा या चित्रफितीत समावेश करण्यात आला आहे. त्यात गेल्या वर्षी पामबीच मार्गावर भरधाव वेगाने दुसऱ्या गाडीची स्पर्धा करताना दोन महाविद्यालयीन तरुणांना आपला प्राण गमवावा लागला होता. त्यातील एक तरुण तर उगवता फुटबॉल चॅम्पियन होता. सीबीडीतील एका पबमधून वाढदिवसाची पार्टी करून हे तरुण रात्री वाशीकडे परतत असताना त्यांच्या आलिशान गाडीला अपघात झाला होता. यात काही तरुणांनी मद्यप्राशन केल्याचे नंतर स्पष्ट झाले होते. गेल्या सोमवारी झालेला अपघात तर फारच भाषण होता. पामबीचमार्गे गाडी प्रतिताशी १०० किमीवर वेग असलेली ही गाडी किल्ले गावठाण चौकात उरणकडे जाणाऱ्या कंटेनरमध्ये खेळण्यातील गाडीसारखी सहज घुसली. कंटनेरच्या खाली गेलेल्या या कारचा वरचा भाग त्यामुळे वेगळा झाला आणि त्यात पुढच्या सीटवर बसलेल्या दोन तरुणांची डोकी धडावेगळी झाली. तरुणाईमध्ये असलेली ही वेगाची नशा जीवनाची कशी दशा करते, याचे चित्रीकरण संकलित करण्याचे काम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या सुरू आहे. दरवषी वाहनचालक आणि विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने वाहतुकीचे नियम कसे पाळावेत आणि कोणत्या नियमांचे उल्लंघन करू नये हे आम्ही सांगत असतो. या वर्षी ही जनजागृती या चित्रफितीद्वारे करणार आहोत असे पाटील यांनी स्पष्ट केले. ही चित्रफीत राज्यात मार्गदर्शक ठरेल असा आशावाद आरटीओचे प्रादेशिक अधिकारी संजय राऊत यांनी व्यक्त केला.