मुंबईमध्ये मोठय़ा संख्येने टोलेजंग इमारती उभ्या राहात असून अग्निशमन दलावरील कामाचा भार वाढू लागला आहे. या पाश्र्वभूमीवर अग्निशमन दलाच्या कामाचे विभाजन करण्यात आले असून इमारतींमधील अग्निशमन यंत्रणेच्या तपासणीसाठी विशेष विभाग स्थापन करण्यात आला आहे. त्याचबरोबर अग्निशमन दलाची क्षमता वाढविण्यासाठी तातडीने रिक्त पदे भरण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
अग्निशमन दलातील सहा विभागीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने त्याचा कार्यभार सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकाऱ्यांवर पडत आहे. इतर अनेक पदेही रिक्त आहेत. मुंबईत पुनर्विकासाच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणावर टोलेजंग इमारती उभ्या राहात आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये आगीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे नव्या-जुन्या इमारती, रुग्णालये, शाळा आदींमधील अग्निशमन यंत्रणा तपासण्याची जबाबदारी अग्निशमन दलावर टाकण्यात आली आहे. अपुरे मनुष्यबळ आणि वाढते काम यामुळे अग्निशमन दलाच्या क्षमतेवर परिणाम होऊ लागला आहे. या पाश्र्वभूमीवर अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांवरील कामाचा भार हलका व्हावा यासाठी कामाचे विभाजन करण्यात आले आहे. इमारतींमधील अग्निशमन यंत्रणेची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला असून या विभागासाठी १०० जणांची भरती करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांनी दिली. त्यामुळे अग्निशमन दलातील अन्य अधिकारी-कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण हलका होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.