मावळत्या वर्षांचा शेवटचा दिवस व नवीन वर्षांचे स्वागत ‘मद्यपान’ करून साजरा करणाऱ्यांसाठी सरकारने पहाटे पाचपर्यंत सवलत दिली असली, तरी ज्या बीअरबार व परमीट मालकांना दुकाने उघडी ठेवायची असतील त्यांना पोलीस आयुक्तांची रीतसर परवानगी घेणे आवश्यक असणार आहे. प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय दुकान कोणी उघडे ठेवल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे पोलीस आयुक्तांनी सोमवारी पत्रकार बैठकीत सांगितले.
दारू पिऊन गाडी चालविणाऱ्या २२१ जणांवर गेल्या वर्षभरात कारवाई करण्यात आली. उद्या (मंगळवारी) सायंकाळी सहापासून शहरात नाकाबंदी करण्यात आली आहे. जिल्ह्य़ात ३७७ परमीट रूम व बार, तर १४७ बीअर शॉपी आहेत. ११७ देशी दारू दुकानांना परवानगी देण्यात आली, तर २९ वाईन शॉप सुरू आहेत. अधिक महसूल मिळावा, म्हणून रात्री उशिरापर्यंत मद्यपान करण्यास परवानगी दिली होती. तथापि, उशिरापर्यंत दुकाने सुरू ठेवण्यासाठी परवानाधारकांना पोलिसांची परवानगी घेणेही आवश्यक असणार आहे. गेल्या वर्षी ३१ डिसेंबरला सेव्हन हिलच्या उड्डाणपुलावरून दारू पिऊन बाटल्या फोडण्याचे प्रकार झाले होते. या वेळी असे कोणतेही कृत्य होऊ नये, याची काळजी घेतली जाणार आहे.
लातूर पोलिसांचे आज ‘जागते रहो’!
लातूर – मावळत्या वर्षांला अखेरचा निरोप व नवीन वर्षांच्या स्वागताची संधी, याचा आनंद घेताना मद्यधुंद अवस्थेत फिरणाऱ्यांची संख्या मोठी असते. मात्र, मद्यपान करून वाहन चालवले जाऊ नये, यासाठी उद्या (मंगळवारी) शहरासह जिल्ह्य़ात सर्वत्र पोलिसांचा जागता पहारा राहणार आहे.
यथेच्छ मद्यपान करून दुचाकीवर तिघांनी बसून, वेगमर्यादा ओलांडून गाडी चालवण्याचे प्रकार हमखास घडतात. त्यातून अपघातही होतात. त्यामुळे उद्या सायंकाळपासून १ जानेवारीला सकाळी सहापर्यंत शहरात १० ठिकाणी नाकाबंदी केली आहे. शहर वाहतूक शाखेचे पोलीस व संबंधित पोलीस ठाण्याचे कर्मचारी तनात केले आहेत. दोन उपविभागीय पोलीस अधिकारी, चार निरीक्षक, १५ उपनिरीक्षक, १५० पोलीस कर्मचारी, दंगल नियंत्रण पथक, महिला छेडछाडविरोधी पथक, शिवाय राज्य राखीव दलाच्या दोन पलटणी यांचा खडा पहारा राहणार आहे. जिल्हाभर सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीतही चोख पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे.
मद्यपान करून वाहन चालवल्यास २ हजार रुपये दंड किंवा ६ महिने कैद किंवा दोन्ही शिक्षा न्यायालय देऊ शकते. वाहनचालकाविरोधात सरसकट खटले भरण्याचे आदेशही पोलिसांना देण्यात आले आहेत.
तळीरामांवर ‘करडी नजर’
िहगोली – मावळत्या वर्षांला निरोप व नवीन वर्षांचे स्वागत करण्याच्या नावाखाली रात्री यथेच्छ पेयपान करून वाहन चालविणाऱ्या तळीरामांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. सर्वानी सार्वजनिक शांतता राखावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे यांनी केले. सरत्या वर्षांला निरोप व नववर्षांचे स्वागत यासाठी सर्वत्र मोठय़ा प्रमाणात ओल्या पाटर्य़ाचे आयोजन केले जाते. मद्यपान करून अनेकजण वाहन चालवितात. परिणामी अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे मद्यपान करून गाडी चालविणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यास केलेल्या बंदोबस्ताची माहिती दाभाडे यांनी दिली. पोलीस उपअधीक्षक सुनील लांजेवार, राम हाके आदींची उपस्थिती होती.
तीन विभागीय पोलीस अधिकारी, १२ निरीक्षक, ४३ सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक, ९७ पोलिस कर्मचारी, राज्य राखीवच्या ४ पलटणी, तसेच धडक कृतिदल नेमले आहे.