खेळाच्या मैदानावर कोणताही कार्यक्रम आयोजित करू नये, असे स्पष्ट आदेश दिले असतानाही पालिकेने वांद्रे येथील एमआयजी क्लब मैदानावर नववर्षांच्या पूर्वसंध्येला पार्टी आयोजित करण्यास परवानगी दिली होती. मात्र स्थानिक नगरसेवकाने विधी समितीच्या बैठकीत हरकतीचा मुद्दा उपस्थित करून न्यायालयाच्या आदेशाची प्रत दाखविताच पालिकेने दिलेली परवानगी रद्द केली. परिणामी आदल्या दिवशी पार्टी रद्द करण्याची वेळ आयोजकांवर आली.
एमआयजी क्लब मैदान हे खेळांसाठी आरक्षित आहे. त्यामुळे तेथे कोणतेच मनोरंजनपर अथवा व्यावसायिक कार्यक्रम आयोजित करता येत नाहीत. मात्र २००७ पूर्वी तेथे मोठय़ा प्रमाणात निरनिराळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात होते. याविरोधात काही मंडळींनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने या मैदानात कोणतेही मनोरंजनपर अथवा व्यावसायिक कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत, असे स्पष्ट आदेश २००७ मध्ये दिले होते. मात्र यंदा नववर्षांच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबर रोजी जंगी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या विरोधात शिवसेना नगरसेवक अनिल त्रिंबककर यांनी विधी समितीच्या बैठकीत आवाज उठविला. न्यायालयाचे आदेश असतानाही पालिकेने पार्टीसाठी परवानगी दिलीच कशी, असा सवाल त्यांनी केला. त्यानंतर विधी खात्याशी विचारविनिमय करून एच-पूर्व विभागातील अधिकाऱ्यांनी पार्टीसाठी दिलेली परवानगी रद्द केली.