शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर राज्यात सर्वत्र उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला, मात्र या दिवसांत राज्यातील वृत्तपत्रांचे वितरण व विक्री सुरू होती. बाळासाहेबांचे व्यक्तिमत्त्व, त्यांच्या आठवणी तसेच त्यांच्या निधनाने जनमानसात उमटलेली शोकभावना यांचा मागोवा घेणारी वृत्तपत्रे वाचकांपर्यंत पोहोचावीत या तळमळीने व कामावरील निष्ठेने वृत्तपत्रांचे वितरण चालू ठेवल्याची भावना वृत्तपत्र विक्रेत्यांनी बोलून दाखविली. यानिमित्ताने बाळासाहेबांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाल्याचे बृहन्मुंबई वृत्तपत्रविक्रेता संघाने आवर्जून नमूद केले आहे.