दिंडोरी मतदारसंघात निफाडची भूमिका निर्णायक ठरणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर सभा घेतल्यामुळे रंगत वाढलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील निकालावर सर्वाधिक प्रभाव टाकणारा तालुका म्हणून निफाडचे नाव घेतले जात असल्यामुळे या तालुक्यातील राजकीय गणित समजावून घेत त्याप्रमाणे प्रचाराची व्यूहरचना महायुती आणि आघाडीकडून आखली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर सभा घेतल्यामुळे रंगत वाढलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील निकालावर सर्वाधिक प्रभाव टाकणारा तालुका म्हणून निफाडचे नाव घेतले जात असल्यामुळे या तालुक्यातील राजकीय गणित समजावून घेत त्याप्रमाणे प्रचाराची व्यूहरचना महायुती आणि आघाडीकडून आखली जात आहे.

लोकसभेच्या मागील निवडणुकीत युतीचे हरिश्चंद्र चव्हाण यांना निफाडमधून भरभक्कम आघाडी मिळाली होती. सुशिक्षित मतदारांचा अधिक भरणा असलेल्या या तालुक्यातील राजकारण पक्षांपेक्षा गटातटांवर अधिक अवलंबून असते. उमेदवार कोणत्या पक्षाचा ही बाब तालुक्यात गौण ठरते. परंतु यावेळच्या निवडणूक प्रचारात उमेदवारांचा पक्ष हा मुद्दा प्रथमच अधिक चर्चेत आला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ वणी येथे मागील आठवडय़ात झालेली सभा पवार यांना नक्कीच दिलासादायक ठरली. कारण या सभेत निफाडमधील आघाडीचे बहुतेक सर्व नेते उपस्थित होते. मागील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात असे चित्र नव्हते. शरद पवार यांची सभेसाठी असलेली उपस्थिती हे निफाडमधील आघाडीच्या सर्व नेत्यांना एकत्र येण्याचे कारण ठरले आहे. दुसरीकडे मागील निवडणुकीप्रमाणेच यावेळीही निफाड तालुक्याने आपल्यामागे उभे राहावे यासाठी महायुतीचे उमेदवार खा. हरिश्चंद्र चव्हाण प्रयत्न करताना दिसून येत आहेत. तालुक्यात पिंपळगावप्रमाणेच ओझरची मतदारसंख्या अधिक आहे. त्यातच महायुतीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेनेचे आ. अनिल कदम यांचे ओझर हे गाव. त्यामुळे गावातून अधिकाधिक मतदान कसे होईल हे चव्हाण यांच्यापेक्षा कदमांसाठी प्रतिष्ठेचे आहे.
याच तालुक्यात गोदाकाठ परिसरातील सहा ते सात गावांना पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला आहे. या गावांमधील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होत आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Nifads essential role in dindori constituency