येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. स्वाती दंडे यांच्या ‘नितळ’ या काव्यसंग्रहाचे पुस्तक, ई-बुक व ध्वनिमुद्रिका अशा त्रिविध रूपात प्रकाशन होणार आहे. काव्यसंग्रह पुस्तकाचे प्रकाशन कवी प्रा. दासू वैद्य यांच्या हस्ते, ई-बुकचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां विनिता गर्दे व ध्वनिमुद्रिकेचे प्रकाशन गायक रवींद्र साठे यांच्या हस्ते रविवारी (दि. ६) होईल.
डिंपल पब्लिकेशनतर्फे प्रकाशित ‘नितळ’ काव्यसंग्रहास ज्येष्ठ लेखिका डॉ. विजया वाड यांची प्रस्तावना लाभली आहे. प्रकाशनाच्या वेळी या काव्यसंग्रहावर आधारित काव्यवाचन-गायनाचा कार्यक्रम रवींद्र साठे, श्रद्धा जोशी, शिवानी कंधारकर, सुनंदा किनगावकर व  डॉ. स्वाती दंडे सादर करणार आहेत. ‘नितळ’ मधील कवितांना संगीतकार बी. प्रणव यांनी स्वरसाज चढवला आहे.  रविवारी संध्याकाळी ६ वाजता संत एकनाथ रंगमंदिरात होणाऱ्या कार्यक्रमास रसिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन दंडे कुटुंबीय व डिंपल पब्लिकेशनच्या नम्रता अशोक मुळे यांनी केले आहे.