सुधी मूर्तीची कथा, नितीश भारद्वाजसारख्या अभिनेत्याचे दिग्दर्शन, अभिनेत्री तनुजाची सर्वार्थाने वेगळी म्हणावी अशी भूमिका आणि जोडीला सचिन खेडेकरसारख्या समर्थ अभिनेत्याची दुहेरी भूमिका, इतक्या चांगल्या गोष्टी ‘पितृऋण’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आल्या आहेत. ‘माझ्या कारकिर्दीची सुरुवात झाली ती मराठी नाटकातून, मग हिंदी नाटकांकडे आणि मराठी चित्रपटांकडून हिंदी चित्रपट आणि मालिकांपर्यंतचा माझा प्रवास होता. त्यामुळे मला जर दिग्दर्शनाचा श्रीगणेशा करायचा असेल तर तो मराठी चित्रपटाकडूनच असायला हवा. आपल्या मातीचे किंवा संस्काराचे म्हणून जे ऋण असतं त्याचं देणं देण्याचा एक छोटा प्रयत्न म्हणजे हा माझा चित्रपट आहे’, अशा शब्दांत अभिनेता-दिग्दर्शक नितीश भारद्वाज यांनी आपल्या चित्रपटामागची भावना ‘वृत्तान्त’कडे व्यक्त केली.
‘पितृऋण’ या चित्रपटाची नेमकी कथा काय, याचा तपशील न देता मानवीय नातेसंबंधांवरची ही कथा आहे, असे भारद्वाज यांनी सांगितले. नियती, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना, आयुष्यात घेतले जाणारे निर्णय, होणारे बदल, त्याचे आपल्याच नात्यांवर उमटणारे पडसाद या म्हटल्या तर अगदी साध्या-साध्या भावनिक गोष्टी आहेत; पण हे भावनिक विश्व उलगडण्याचा प्रयत्न फार कमी चित्रपटांतून केला जातो. सुधी मूर्तीनी जेव्हा कानडीत लिहिलेली ही कथा अनुवादित करून माझ्याक डे पाठवली आणि मी ती वाचली तेव्हा अशा प्रकारची भावना आतापर्यंत कोणत्याही चित्रपटातून दाखविली नसल्याची जाणीव मला झाली. मला ती कथा आवडली आणि मी चित्रपट करायचा निर्णय घेतला. मूळ कथा ही हुबळी-धारवाड परिसरातील मराठी घरात घडणारी असल्याने चित्रपटही मराठीतच केला पाहिजे, हा माझा विचार पक्का होता. त्यानुसार मग पुढच्या गोष्टी घडत गेल्या, असे भारद्वाज यांनी सांगितले. या चित्रपटातील विधवेच्या भूमिकेसाठी तुम्ही अभिनेत्री तनुजा यांचा विचार कसा काय केलात, या प्रश्नावर खरेतर, ही भूमिका मराठीतील काही अभिनेत्री चांगल्या करू शकल्या असत्या. पण त्यातील बऱ्याचजणी टीव्हीवर, चित्रपटांमधून, जाहिरातींमधून अशाच भूमिका करताना दिसल्या आहेत. त्यामुळे या भूमिकेसाठी मला काहीतरी वेगळं हवं होतं. यशजींच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गेलो असताना समोरच तनुजाजी दिसल्या, आणि अरे या तर मूळच्या मराठीच आहेत. शिवाय, ३५ वर्षांपूर्वी त्यांनी ‘झाकोळ’ हा मराठी चित्रपट केला होता. त्यानंतर त्या कधी मराठीत काय, हिंदीतही फारशा दिसलेल्या नाहीत. तसेच त्यांची आजपर्यंतची प्रतिमा ही अगदी चुलबुली, खोडकर अभिनेत्री अशी असल्याने त्यांना इतक्या सशक्त भूमिकेत पाहणे हा प्रेक्षकांसाठी नक्कीच एक सुखद धक्का असेल, असे ते म्हणाले.
तनुजा यांच्याबरोबर सचिन खेडेकर यांनी या चित्रपटात दुहेरी भूमिको केली आहे. दुहेरी भूमिका करणं हे अगदी सोपं आहे, पण अनेकदा या भूमिका करताना त्या फार अंगावर येतील अशा पद्धतीने साकारल्या जातात. मुळात, एक अभिनेता म्हणून मी आजवर नैसर्गिक अभिनयावर भर देत आलो आहे. तुम्ही अभिनय करताय.. असं जिथे लक्षात येतं तिथं तुमची भूमिका फसते. त्यामुळे या चित्रपटासाठी मला सहजपणे अभिनय करणारा कलाकार हवा होता. सचिन खेडेकर हा खरोखरच एक संवेदनशील अभिनेता आहे. आम्ही दोघेही या भूमिकांचा एक आकृतिबंध ठरवून त्यावर चर्चा करायचो आणि मग निश्चित स्वरूप द्यायचो. पण मला नेमकं काय हवंय ते त्याला उमगलं होतं, अशा शब्दांत नितीश भारद्वाज यांनी सचिन खेडेकर यांचे कौतुक केले. अतिशय वेगळ्या विषयावरच्या या चित्रपटाचे चित्रीकरण वाई, पुणे आणि कोकणात करण्यात आले आहे. एकेकाळी कृष्ण म्हटले की ‘महाभारत’ मालिकेतील नितीश भारद्वाज यांनी साकारलेला हसतमुख कृष्णाचा चेहराच डोळ्यासमोर यायचा. आज वाहिन्यांवर अनेक ऐतिहासिक, पौराणिक मालिका येत आहेत त्यात अगदी ‘महाभारत’ही नव्याने दाखल होते आहे. एक कलाकार म्हणून तुम्हाला नेमका काय फरक जाणवतो, असे विचारताच फार मोठा फरक आहे तो तंत्रज्ञानाचा आहे, असे ते सांगतात. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आजच्या मालिका या फार चकाचक झाल्या आहेत. पण आमच्या वेळेला पौराणिक मालिकांच्या पटकथा आणि संवाद हे फार प्रभावीपणे लिहिले जायचे. त्या भारदस्त संवादाची आणि व्यक्तिरेखांच्या मांडणीची कमतरता आजच्या या मालिकोंमध्ये जाणवत असल्याचे मत त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केले.